- शाळा सुरु करण्यापूर्वी आम्हाला खूप तयारी करावी लागेल, त्यासाठी आणखी वेळ लागणार आहे- वर्षा गायकवाड
राज्यातील शाळा कधी सुरु होणार हे अजून निश्चित झाले नाही आहे. शाळा सुरु करण्यापूर्वी आम्हाला खूप तयारी करावी लागेल, त्यासाठी आणखी वेळ लागणार आहे. त्यामुळे शाळा इतक्यात सुरु होणार नाहीत, अशी माहिती राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
सध्या ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव झाला आहे. त्यातच अनेक शाळांचा वापर हा विलगीकरणासाठी केला जात आहे. अनेक शिक्षकांना कोव्हिडच्या ड्युटीवर नेमण्यात आलं आहे. शाळा सुरु करण्यापूर्वी आम्हाला खूप तयारी करावी लागेल, त्यामुळे सरसकट शाळा सुरु करण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंतिम निर्णय होईल” असे वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले. त्या नांदेडमध्ये पत्रकारांशी बोलत होत्या.
केंद्र सरकारने २१ सप्टेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा प्रत्यक्ष उघडण्याची मुभा दिली असली, तरी महाराष्ट्रात नोव्हेंबर महिना उजाडण्याची वाट पहावी लागणार आहे. संस्थाचालकांनी शाळा सुरु करण्यास नकार दिल्याने दिवाळीनंतरच याबाबत निर्णय घेतला जाईल, असे वर्षा गायकवाड यांनी चार दिवसांपूर्वीच स्पष्ट केले होते. कोरोनाच्या धास्तीने पाल्यांना प्रत्यक्ष शाळेत पाठवण्यास पालक राजी नसल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.
केंद्र सरकारच्या सूचनेप्रमाणे 21 सप्टेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरु करता येतील का? याबाबत चाचपणी करण्यासाठी शिक्षण विभागाने गेल्या आठवड्यात संस्थाचालक महामंडळाची बैठक घेतली होती. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या पाहता इतक्यात शाळा उघडणे योग्य ठरणार नाही, अशी भूमिका संस्थाचालकांनी ऑनलाईन बैठकीत घेतली.
दिवाळी 13 ते 16 नोव्हेंबरदरम्यान असल्याने किमान आणखी दोन महिने तरी विद्यार्थ्यांना शाळेत जावे लागणार नाही. मात्र ऑनलाईन शिक्षण सुरुच राहणार आहे.