चेन्नई सुपर किंग्ज: आयपीएलमध्ये सर्वात चांगली कामगिरी करणारा संघ

0
402

आयपीएलचा १३ वा हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. आयपीएल २०२० च्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स हे दोन संघ एकमेकांशी भिडतील. आयपीएलमधील सर्वात चांगली कामगिरी करणारा संघ अशी चेन्नई सुपर किंग्जची ओळख आहे. मुंबई संघापेक्षा त्यांनी एक विजेतेपद कमी मिळवले असेल तरी आतापर्यंत चेन्नईने खेळलेल्या १० हंगामात ८ वेळा ते क्वालिफाय फेरीत पोहोचले आहेत. आता १२व्या हंगामात देखील धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईचा संघ हा सर्वात फेव्हरेट मानला जातो.

टीम इंडियाचा कॅप्टन कुल माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने अनपेक्षितपणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. ट्वेन्टी-20 वर्ल्डकप, 50ओव्हर वर्ल्डकप, चॅम्पियन्स ट्रॉफी, कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान, आयपीएलची जेतेपदं या सगळ्यात धोनीचं नेतृत्व महत्त्वपूर्ण ठरलं. चेन्नई सुपर किंग्स आणि धोनी यांचं अतिशय घट्ट नातं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केलेल्या धोनीचं यावेळी संपूर्ण लक्ष्य चेन्नईला जेतेपद मिळवून देण्याकडे असेल.

युएई गाठल्यानंतर चेन्नईच्या संघाला नेट्समध्ये सराव करण्यासाठी बराच काळ वाट पाहावी लागली. याचे कारण म्हणजे त्यांच्या १३ सदस्यांना कोरोनाची बाधा झाली होती, ज्यात दोन खेळाडूंचा समावेश होता. ३ वेळा आयपीएल विजेता झालेला चेन्नई सुपर किंग्स संघ आता चौथ्यांदा आपलं नाव आयपीएल चषकावर करण्यास तयार असेल. तरीही चेन्नईला आयपीएल मोसमाआधी काही धक्के बसले त्यांच्या संघातील सुरेश रैना आणि हरभजन सिंग या महत्त्वाच्या खेळाडूंची माघार घेतली. पण तरीही चेन्नई संघात बरेचसे पर्यायी खेळाडू असल्याने त्यांना त्यांच्या संघातील समतोल राखणे शक्य आहे.

चेन्नईकडे धोनीसारखा खमका कर्णधार आहे. तसेच या संघात शेन वॉटसन, ड्वेन ब्राव्हो, इम्रान ताहिर, डू प्लेसिस, रविंद्र जाडेजा, अंबाती रायडू, केदार जाधव यांसारख्या अनुभवी खेळाडूंचा समावेश आहे. रैना आणि हरभजनच्या अनुपस्थितीत या खेळाडूंना त्यांचा खेळ अधिक उंचावावा लागणार आहे. या संघात बरेच उत्कृष्ट फिरकीपटू असून त्यांना युएईतील खेळपट्ट्या फायदेशीर ठरू शकतील.

यंदाच्या लिलावात चेन्नईने अष्टपैलू सॅम करन, फास्ट बॉलर जोश हेझलवूड, स्पिनर पीयुष चावला यांना ताफ्यात समाविष्ट केलं आहे. युएईत फिरकीला पोषक खेळपट्यांवर चेन्नईचं फिरकीबहुल आक्रमण निर्णायक ठरू शकतं.

चेन्नई संघ : – 

भारतीय खेळाडू : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), केदार जाधव, रविंद्र जाडेजा, पियुष चावला, करण शर्मा, शार्दुल ठाकूर, अंबाती रायडू, मुरली विजय, दीपक चहर, केएम असिफ, नारायण जगदीसन, मोनू कुमार, ऋतुराज गायकवाड, साई किशोर

परदेशी खेळाडू : ड्वेन ब्राव्हो, सॅम करन, शेन वॉटसन, जॉश हेझलवूड, फॅफ डू प्लेसिस, इम्रान ताहिर, लुंगी इंगिडी, मिचेल सँटनर