कोरबो, लोरबो, जीतबो रे :कोलकाता नाईट रायडर्स संघ सज्ज

0
444

कोरोना व्हायरसमुळे अनिश्चित काळासाठी स्थगित झालेली आयपीएल स्पर्धा १९ सप्टेंबरपासून ते १० नोव्हेंबरपर्यंत युएई येथे खेळवली जाणार आहे. या स्पर्धेतील शाहरुख खान यांच्या मालकीच्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने आत्तापर्यंत २०१२ आणि २०१४ ला आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे. तसेच त्यांनी २०१६, २०१७ आणि २०१८ असे सलग तीन वर्षे प्लेऑफमध्येही स्थान मिळवले होते. मागील काही वर्षांत आयपीएल स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी संघांपैकी एक म्हणजे कोलकाता नाईट रायडर्स. परंतु, त्यांना ही स्पर्धा जिंकता आली नाही. यंदा मात्र दिनेश कार्तिकच्या नेतृत्वात आयपीएलचे तिसऱ्यांदा जेतेपद मिळवण्यास कोलकाता संघ नक्कीच उत्सुक असेल.

या संघात ‘टी-२० स्पेशॅलिस्ट’ असणाऱ्या आंद्रे रसेल आणि सुनील नरीन या खेळाडूंचा समावेश आहे. आपल्या फटकेबाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या रसेलने मागील मोसमात ५७ च्या सरासरी आणि २०५ च्या स्ट्राईक रेटने १४ सामन्यांत ५१० धावा चोपून काढल्या होत्या. तो यंदाही या कामगिरीची पुनरावृत्ती करेल अशी कोलकाता संघाला नक्कीच आशा असेल. त्याला फलंदाजीत दिनेश कार्तिक, शुभमन गिल, इयॉन मॉर्गन, सिद्धेश लाड यांची साथ लाभेल.

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिंस यंदाच्या सीझनमध्ये सर्वाधिक चर्चेत राहणारा वेगवान गोलंदाज आहे. गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या या गोलंदाजाला कोलकत्ता नाईट रायडर्सने आयपीएल 2020 च्या लिलावात 15.50 कोटी रुपये मोजत आपल्या संघात घेतलं आहे. त्याच्या अनुभवाचा कमलेश नागरकोटी, प्रसिध कृष्णा, शिवम मावी या युवा गोलंदाजांनाही फायदा होईल. तसेच युएईतील फिरकीला अनुकूल खेळपट्ट्या नरीन, कुलदीप यादव यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकतील.

कोलकाता संघ –

भारतीय खेळाडू : दिनेश कार्तिक (कर्णधार), कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव, नितीश राणा, प्रसिध कृष्णा, रिंकू सिंग, संदीप वारियर, शिवम मावी, शुभमन गिल, सिद्धेश लाड, वरुण चक्रवर्ती, राहुल त्रिपाठी, निखिल नाईक, एम सिद्धार्थ

परदेशी खेळाडू : आंद्रे रसेल, लॉकी फर्ग्युसन, सुनील नरीन, पॅट कमिन्स, इयॉन मॉर्गन, टॉम बँटन, क्रिस ग्रीन, अली खान

जेतेपद – दोन वेळा (२०१२, २०१४)