आयपीएल २०२० चे बिगूल वाजले; आज रंगणार मुंबई आणि चेन्नईमध्ये सामना

0
313

आयपीएलच्या १३व्या मोसमाला शनिवारपासून सुरुवात होणार आहे. गतविजेती मुंबई आणि चेन्नईच्या टीममध्ये पहिला सामना रंगणार आहे. कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे यंदा प्रेक्षकांशिवायच सामने होणार आहेत. तसंच युएईमधल्या संथ खेळपट्ट्यांमुळे सगळ्याच टीमना वेगळी रणनिती अवलंबवावी लागणार आहे. २०१९ साली झालेल्या अंतिम फेरीत थरारक लढतीत मुंबई इंडियन्सने चेन्नईवर एका धावेने मात करत विजेतेपद पटकावलं होतं. यंदा करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता बीसीसीआयने स्पर्धेचं आयोजन युएईत केलं आहे. मुंबई आणि चेन्नई हे दोन संघ आयपीएलमध्ये सर्वात यशस्वी संघ मानले जातात. मुंबईने आतापर्यंत सर्वाधिकवेळा म्हणजेच ४ तर चेन्नईने ३ वेळा विजेतेपदं पटकावली आहेत.

चॅम्पिअन्स लिगमधील दोन सामने पकडले असता मुंबई आणि चेन्नईचा संघ आतापर्यंत ३० वेळा समोरासमोर आले आहेत. ज्यापैकी १८ सामने मुंबईने जिंकले असून १२ सामने चेन्नईने जिंकले आहेत. आज अबुधाबीच्या मैदानावर संध्याकाळी साडेसात वाजता दोन्ही संघ समोरासमोर येतील. त्यामुळे या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

चेन्नईची रणनिती:-

चेन्नईकडून शेन वॉटसन, अंबाती रायुडू ओपनिंगला खेळण्याची शक्यता आहे. धोनीकडे फाफ डुप्लेसिसलाही खेळवण्याचा पर्याय आहे. पण टीम संयोजनावर या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. नियमानुसार टीममध्ये ४ परदेशी खेळाडू असू शकतात, त्यामुळे वॉटसन आणि ब्राव्होचं खेळणं निश्चित आहे. तर बॉलिंगमध्ये लुंगी एनगिडी, इमरान ताहीर मिचेल सॅन्टनर, जोश हेजलवूड हे पर्याय आहेत.

सुरेश रैना आणि हरभजन सिंग यांनी स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यामुळे धोनीला या दोन तगड्या खेळाडूंचे बदली खेळाडू शोधावे लागणार आहेत. तर रैनाचा बदली खेळाडू म्हणून मानला जाणारा ऋतुराज गायकवाड अजूनही पूर्णपणे फिट नाही, त्यामुळे तो पहिली मॅच खेळणार नाही. अशा परिस्थितीमध्ये केदार जाधव आणि रवींद्र जडेजावर मोठी जबाबदारी येऊ शकते. रैनाच्या नंबरवर धोनी फलंदाजीला येऊ शकतो.

मुंबई रणनिती:-

दुसरीकडे मुंबईने क्रिस लीनला टीममध्ये घेतलं आहे, पण सुरुवातीच्या मॅचमध्ये त्याची खेळण्याची शक्यता कमी आहे. रोहित शर्मा आणि क्विंटन डिकॉक ओपनिंगला खेळणार आहेत, हे कर्णधार रोहित शर्माने स्पष्ट केलं आहे. मधल्या फळीत मुंबईकडे सूर्यकुमार यादव, कायरन पोलार्ड, हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या यांचासारखे तगडे खेळाडू आहेत. तसंच गरज पडली तर इशान किशन. शेरफन रदरफोर्ड यांचा पर्यायही रोहितपुढे खुला आहे.

मुंबईला राहुल चहरकडून मागच्या वर्षीसारख्या कामगिरीची अपेक्षा असेल. मुंबईचा हुकमी एक्का असलेला लसिथ मलिंगा यंदाच्या मोसमात खेळणार नाही. त्याच्याऐवजी बुमराहवर जास्त जबाबदारी असणार आहे. बुमराहबरोबर ट्रेन्ट बोल्ट, नॅथन कुल्टर नाईल, जेम्स पॅटिनसन, धवल कुलकर्णी हे फास्ट बॉलिंगसाठीचे पर्याय आहेत.

असा असेल संभाव्य संघ-

मुंबई इंडियन्स-
रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डिकॉक(विकेटकिपर), इशान किशन, सुर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, किरॉन पोलार्ड, क्रुणाल पांड्या, नाथन कुल्टर नाइल राहुल चाहर, जसप्रित बुमराह आणि ट्रेंट बोल्ट

चेन्नई सुपर किंग्ज- महेंद्र सिंह धोनी (कर्णधार आणि विकेटकिपर), शेन वॉट्सन, अंबाती रायडू, फाफ डुप्लिसिस, केदार जाधव, रविंद्र जडेजा, ड्वेन ब्रावो, शार्दुल ठाकूर, पीयुष चावला, दीपक चाहर आणि इमरान ताहिर.