करोना व्हायरसचे संकट असताना जगातील सर्वात मोठी आणि लोकप्रिय आयपीएल स्पर्धा होत आहे. या वर्षी एप्रिल-मे महिन्यात होणारी ही स्पर्धा आता सप्टेंबर महिन्यात होत आहे. करोनामुळे सर्वच क्रीडा क्षेत्रातील नियम बदलले आहेत. हे बदललेले नियम क्रिकेटला सुद्धा लागू आहेत. पहिला सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज (CSK) यांच्यात होणार आहे. 10 नोव्हेंबरपर्यंत असणाऱ्या या स्पर्धेत अनेक कडक नियम लागू करण्यात आले आहेत. कोरोनामुळे यंदाची आयपीएल स्पर्धा प्रक्षेकांशिवाय आयोजित करण्यात आली आहे. मात्र यंदा आयपीएलमध्ये काही नियम असणार आहेत.
यंदाचे आयपीएल नेहमीपेक्षा वेगळे
आयपीएल ही जगातील सर्वात लोकप्रिय टी-२० स्पर्धा. त्यामुळे चाहते ही स्पर्धा स्टेडियममध्ये जाऊन पाहण्यास उत्सुक असतात. यंदा मात्र कोरोनामुळे प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश मिळणार नाही. तसेच चिअरलिडर्सचा डान्स व्हिडिओच्या माध्यमातून दिसणार आहे. प्रेक्षक स्टेडियममध्ये प्रत्यक्षात उपस्थित राहणार नसले, तरी त्यांची उणीव भासू नये म्हणून काही संघांनी चाहत्यांचे चिअर करतानाचे व्हिडिओ आधीच तयार करून ठेवले आहेत. ते सामन्यादरम्यान लावण्यात येतील. त्यामुळे यंदाचे आयपीएल नेहमीपेक्षा वेगळे असणार आहे.
रिकामे स्टेडियम
कोरोनाव्हायरस हा एका माणसकडून दुसऱ्याकडे लगेच पसरला जातो. त्यामुळेच आयपीएल सामने प्रेक्षकांशिवाय आयोजित करण्यात येणार आहे. म्हणजेच स्टेडियमवर प्रेक्षक नसतील. हा निर्णय कोरोनाचे संक्रमण होऊ नये या दृष्टीने घेण्यात आला आहे.
थुंकीच्या वापरावर बंदी
सर्व साधारणपणे क्रिकेटमध्ये बॉल स्विंग करण्यासाठी थुंकीचा वापर केला जातो. पण यावेळी करोना व्हायरसमुळे थुंकी वापरता येणार नाही. आयसीसीने बॉल चमकवण्यासाठी थुंकीचा वापर करण्यावर बंदी घातली आहे. या संदर्भात प्रत्येक संघाला दोन वेळा इशाला दिला जाईल. जर एखाद्या संघातील खेळाडूकडून तिसऱ्यांदा अशी चूक झाली तर विरोधी संघाला पाच धावा अतिरिक्त मिळतील. त्याच बरोबर टॉस झाल्यानंतर कर्णधारांना एकमेकांसोबत हात मिळवता येणार नाही.
ठिकठिकाणी सॅनिटायझर
दुसरा मोठा बदल म्हणजे स्टेडियमवर ठिकठिकाणी सॅनिटायझर ठेवण्यात आले आहे. जेथे वेळोवेळी खेळाडू आपल्या हात सॅनिटाइज करतील. खेळाडूंना सॅनिटायझरचा वापर करणे अनिवार्य आहे.
अनलिमिटेड करोना सब्स्टीट्यूट
करोनाच्या वाढत्या संक्रमणाचा विचार करू यावेळी अनलिमिटेड करोना सब्स्टीट्यूटची तरतूद करण्यात आली आहे. म्हणजेच एखाद्या खेळाडूला करोना झाला तर त्याच्या बदली दुसऱ्या खेळाडूला संघात घेता येऊ शकते. या नियमानुसार फलंदाजाला फलंदाज, गोलंदाजाला गोलंदाज घेता येऊ शकतो.
थर्ड अम्पायर नो बॉल
पहिल्यांदाच आयपीएलमध्ये नो बॉलचा नियम असणार आहे. आता सामन्यात फ्रंटफूट नो बॉल फील्ड अम्पायरच्या जागी थर्ड अम्पायर देतील. गेल्या वर्षी झालेल्या भारत-वेस्ट इंडिज एकदिवसीय मालिकेत या नियमाचे ट्रायल करण्यात आले होते.
सामन्याची वेळ
या वर्षी आयपीएलच्या सामन्यांची वेळ देखील बदलण्यात आली आहे. दर वर्षी ८ वाजता सुरू होणारा सामना या वर्षी साडे सात वाजता तर दुपारी चार वाजता सुरू होणारा सामना साडे तीन वाजता सुरू होणार आहे.
सर्वात जास्त दिवस चालणार
या वर्षी करोनामुळे आयपीएल स्पर्धेचा कालावधी ५३ दिवस असणार आहे. जो गेल्या दोन हंगामापेक्षा ३ दिवस अधिक आहे.