ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन

0
515

प्रेमळ व्यक्तिमत्त्व व कसदार अभिनयाने मराठी, हिंदी सिनेसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं काल निधन झालं. आशालता वाबगावकर या मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री होत्या. अनेक चित्रपटांमध्ये झळकल्यानंतर त्यांनी त्यांच्या मोर्चा मालिकांकडे वळविला होता. काही दिवसांपूर्वीच सुरु झालेल्या ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेत त्या महत्त्वपूर्ण भूमिका साकारत होत्या. मात्र या सेटवर त्यांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं. त्यानंतर ५ दिवस साताऱ्यातील प्रतिक्षा हॉस्पिटल येथे त्यांच्यावर उपचार सुरु होते.

साताऱ्यातील लोणंद भागात सोनी मराठीवरील आई माझी काळूबाई या मालिकेचे चित्रीकरण सुरु होतं. या मालिकेच्या चित्रीकरणासाठी मुंबईवरुन एक डान्स ग्रुप बोलावण्यात आला होता. त्यांच्यामार्फत सेटवर कोरोनाची लागण झाल्याचं बोललं जात होतं. त्यानतंर सेटवरील जवळपास 27 जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यात ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचाही समावेश होता.

आशालता वाबगांवकर यांचा जन्म 31 मे 1941 रोजी गोव्यात झाला. त्या मुळच्या गोव्याच्या असल्याने त्यांनी कोंकणी आणि मराठी नाटकातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. आशालता वाबगांवकर यांनी आतापर्यंत जवळपास 100 हिंदी आणि मराठी चित्रपटात काम केले आहे. अपने पराये या हिंदी चित्रपटातून त्यांनी सिने सृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटातील कामाबद्दल आशालतांना बेंगाल क्रिटिक्सचे पारितोषिक मिळाले होते. तर रायगडाला जेव्हा जाग येते हे त्यांचे पहिले नाटक होते.

हिंदी सिनेसृष्टीतही त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली होती. त्यांनी विविध भाषांतील १०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं होतं. छोट्या पडद्यावरील अनेक टीव्ही मालिकांमध्येही त्या झळकल्या होत्या. संगीत नाटक मत्स्यगंधाच्या माध्यमातून त्यांनी नाटकातील कारर्कीदीस सुरुवात केली. त्यानंतर ‘गुंतता हृदय हे, रायगडाला जेव्हा जाग येते, चिन्ना आणि महानंदा’ अशा नाटकांमध्ये त्यांनी प्रमुख भूमिका साकारल्या. मराठी चित्रपटसृष्टीत ‘उंबरठा, सूत्रधार, नवरी मिळे नवऱ्याला, वहिनीची माया, माहेरची साडी’ हे त्यांचे गाजलेले चित्रपट होते.