धनंजय माने इथेच राहतात का? ‘अशी ही बनवाबनवी’ चित्रपटाला तब्बल ३२ वर्षे पूर्ण

0
415

सुपरहिट ‘अशी ही बनवाबनवी’ या 80 च्या दशकात प्रदर्शित झालेल्या सिनेमाने लोकप्रियतेचे अनेक उच्चांक मोडले. आजही हा सिनेमा ताजा आणि टवटवीत वाटतो व कितीही वेळा पाहिला तरी सिनेरसिकांचं मन भरत नाही . निखळ मनोरंजन करणा-या ह्या अफलातून ‘अशी ही बनवाबनवी’ या सिनेमाला प्रदर्शित होऊन आज 32 वर्ष पुर्ण झाली. आजच्याच दिवशी १९८८ साली, म्हणजे २३ सप्टेंबर १९८८ रोजी मराठी सिनेसृष्टीच्या इतिहासात एक सोनेरी पान जोडले गेले. याच दिवशी राज्यात सर्वत्र ‘अशी ही बनवाबनवी’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. एवढी वर्ष उलटली तरी या सिनेमाची जादू आजही कमी झालेली दिसत नाही. एकतीस वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या सिनेमातील संवादांवरून आजही मिम्स बनवले जातात. या सिनेमांतील संवाद अनेकांना तोंडपाठ आहेत

अशोक सराफ, सचिन पिळगांवकर, लक्ष्मिकांत बेर्डे, सुशांत रे ह्या चौकडीबरोबरच नयनतारा, सुधीर जोशी, अश्विनी भावे, निवेदिता सराफ, सुप्रिया व प्रिया बेर्डे यांच्या सदाबहार अभिनयाने हा सिनेमा सजला. कलाविश्वात विनोदाची परिभाषा बदलणाऱ्या आणि असंख्या सिनेरसिकांच्या मनात घर करणाऱ्या या चित्रपटाविषयी सांगावं आणि बोलावं तितकं कमीच. कारण आजही या चित्रपटातील प्रत्येक दृश्य आम्हाला तोंडपाठ आहे, असं अभिमानानं सांगणाऱ्यांचा आकडा आश्चर्यचकित करुन जातो.

मराठी चित्रपटाच्या इतिहासात क्वचित एखाद्या चित्रपटाला असे भाग्य लाभले आहे. आज एवढय़ा वर्षांनंतरही मराठी प्रेक्षकांची प्रचंड पसंती या चित्रपटाला मिळते आहे. मराठी माणूस मग तो सामान्य व्यक्ती असो वा जागतिक कीर्तीचा क्रिकेटमधील देव भारतरत्न सचिन तेंडुलकर असो अशी ही बनवाबनवी हा चित्रपट या सर्वाच्या आवडीचा, जिव्हाळ्याचा विषय आहे. जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला तो आणि आजचा इंटरनेटचा जमाना यात जमीन-अस्मानाचे अंतर असले तरी नेटक ऱ्यांची पसंतीही या चित्रपटाला मिळाली आहे.

चित्रपट प्रदर्शित होऊन आज कित्येक वर्षे उलटली असली तरीही त्यातील अनेक दृश्य आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. मग ते धनंजय मानेने (अशोक सराफ यांनी) दुधाच्या केंद्रावर रांगेत उभं राहून चक्कर आल्याचं नाटक करणं असो किंवा, ‘धनंजय माने इथेच राहतात का?’, असं विचारणारा लक्ष्या असो. प्रासंगिक विनोद आणि त्यातून पुढे जाणारा चित्रपट म्हणजे ‘अशी ही बनवाबनवी’. त्यामुळं हा चित्रपट खऱ्या अर्थानं मराठी चित्रपट जगताच्या इतिहासात एक महत्त्वाचं पान जोडून गेला आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

अशी ही बनवा बनवी चित्रपटातील प्रत्येक पात्रात काही अंशी निरागसपणा भरला आहे, आणि हीच गोष्ट सिनेमामधली जमेची बाजु. कुठेही अतिशयोक्ती न करता प्रासंगिक विनोदातुन आणि प्रमुख कलाकारांच्या अचुक संवादफेकीमुळे ‘अशी ही बनवाबनवी’ सुरुवातीपासुन शेवटपर्यंत आपलं मनोरंजन करतो. आजही असा एकही मराठी रसिक तुम्हाला सापडणार नाही ज्याने हा चित्रपट पाहिलाच नाही असेल किंवा त्यातील डायलॉग्स लक्षात नसेल.