फ्लाइट लेफ्टनंट शिवांगी सिंह; राफेल’च्या पहिल्या महिला फायटर पायलट

0
282

चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर नुकतेच भारतीय हवाई दलात दाखल झालेली लढावू ‘राफेल’ विमानं सीमेजवळ आकाशात घिरट्या घालताना दिसत आहेत. ‘राफेल’ विमानं हाताळण्यासाठी भारतीय हवाई दलाच्या पायलटांना खास ट्रेनिंगही देण्यात आलेलं आहे. या लढावू विमानांची जबाबदारी ‘गोल्डन अ‍ॅरो’कडे देण्यात आलेला आहे . ‘गोल्डन अ‍ॅरो’ राफेलच्या पहिल्या स्क्वार्डनमध्ये एका महिला फायटर पायलटचा समावेश करण्यात आला आहे. फ्लाइट लेफ्टनंट शिवांगी सिंह असे या महिला फायटर पायलटचे नाव आहे.

शिवांगी सिंह २०१७ साली इंडियन एअर फोर्सच्या सेवेत रुजू झाल्या. त्या दुसऱ्या बॅचमधील फायटर पायलट आहेत. वाराणासीच्या असलेल्या शिवांगी सिंह यांचे सध्या प्रशिक्षण सुरु आहे. त्या लवकरच अंबाला स्थित ‘गोल्डन अ‍ॅरो’ च्या १७ व्या स्क्वार्डनच्या भाग होतील.

वाराणसीतून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर शिवांगी सिंह यांनी बनारस हिंदू विद्यापीठात प्रवेश घेतला. तिथे त्या नॅशनल कॅडेट कॉर्पमध्ये ७ यूपी एअर स्क्वाड्रनचा भाग होत्या. त्यानंतर २०१६ साली ट्रेनिंगसाठी एअर फोर्स अ‍ॅकेडमीत प्रवेश घेतला. भारतीय हवाई दलातील दहा महिला वैमानिकांनी सुखोई, मिग २९ यासह सर्व प्रकारची लढाऊ जेट विमाने चालवली आहेत.

२०१७ मध्ये IAF मध्ये रुजू झाल्यापासून फ्लाइट लेफ्टनंट शिवांगी सिंह या मिग-२१ बायसन विमानाच्या वैमानिक आहेत. राजस्थानातून त्या अंबालामध्ये दाखल झाल्या आहेत. राजस्थानामध्ये त्यांनी विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांच्यासोबत मिग-२१ बायसन विमान उडवले आहे.

नव्यानेच समावेश झालेल्या राफेल विमानांच्या वैमानिकांच्या चमूमध्ये हवाई दलातील महिला वैमानिकांची निवड करण्यात येणार असल्याचे वृत्त सोमवारी प्रसिद्ध झाले होते. राफेल एक मल्टीरोल म्हणजे बहुउद्देशीय फायटर विमान आहे.

भारतीय हवाई दलाचा इतिहास:

कारगिल युद्धात पहिल्यांदाच भारतीय हवाई दलानं महिला पायलटांना आपल्या ऑपरेशन्समध्ये सहभागी करून घेतलं होतं. २०१६ साली मोदी सरकारकडून महिलांना फायटर विमानांच्या संचालनाची परवानगी देण्यात आली होती. तेव्हापासून आत्तापर्यंत १० महिला पायलट लढावू विमानांसहीत उड्डाण घेण्यास सज्ज झाल्या आहेत.

भारतीय हवाई दलात सहभागी झालेल्या १० महिला फायटर पायलटांनी आत्तापर्यंत सुखोई ३० एमकेआय, मिग – २१, मिग – २९ यांसारखे अनेक लढावू विमानांचा ताबा घेतलाय. २०१६ साली केंद्र सरकारकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर भारतीय हवाई दलात ‘महिला फायटर पायलट’ बनण्याचा पहिला मान तीन महिलांना मिळाला. यामध्ये फ्लाईट लेफ्टनंट अवनी चतुर्वेदी, फ्लाईट लेफ्टनंट भावना कांत आणि फ्लाईट लेफ्टनंट मोहना सिंह यांचा समावेश होता.