एका सुरेल पर्वाचा अस्त; सुप्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांचे निधन

0
321

भारतीय संगीत विश्वात अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान देणारे ज्येष्ठ गायक एस.पी. बालसुब्रमण्यम यांनी शुक्रवारी जगाचा निरोप घेतला. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पुत्र एस.पी. चरण यांनी याबाबतची अधिकृत माहिती दिली. दोन आठवड्यांपूर्वी बालासुब्रमण्यम यांनी करोनावर मात केली होती. मात्र त्यानंतर अचानक त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांना लाइफ सपोर्टवर ठेवण्यात आलं होतं. परंतु, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे. बालसुब्रमण्यम यांच्या निधनामुळे कलाविश्वावर शोककळा पसरली असून अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

जवळपास ४० हजारहून अधिक गीतं गाणाऱ्या एसपीबी यांनी संगीत विश्वात एक मैलाचा दगड प्रस्थापित केला होता. नव्वदचं दशक त्यांनी खऱ्या अर्थानं आपल्या नावावर केलं होतं. जवळपास १६ भाषांमध्ये त्यांनी गाणी गायली होती. कमल हासन आणि सलमान खान या अभिनेत्यांसाठी त्यांचा आवाज प्रेक्षकांची विशेष दाद मिळवून गेला. त्यांनी एकदा 12 तासामध्ये 21 गाणी रेकॉर्ड केली होती. कन्नड संगीतकार उपेंद्र कुमार यांच्यासाठी त्यांनी ही गाणी रेकॉर्ड केली होती.

एसपी बालसुब्रमण्यम यांच्याबद्दल..
एसपी बालसुब्रमण्यम हे नाव माहीत नाही असा संगीतप्रेमी भारतात सापडणार नाही. संपूर्ण भारताला त्यांची ओळख झाली ती 90 च्या दशकात. जेव्हा सलमान खानचा आवाज म्हणून त्यांना ओळखलं जाऊ लागलं. सलमान खानचे मैने प्यार किया, पत्थर के फूल, हम आपके है कौन, रोजा आदी अनेक हिंदी चित्रपटांसाठी गायन केलं होतं. पण त्याही आधी एक दुजे के लिये या गाजलेल्या चित्रपटातली त्यांची गाणी विशेष गाजली होती. एसपी यांनी डबिंग आर्टिस्ट म्हणूनही काम केलं होतं.

दाक्षिणात्य संगिताबरोबच बॉलिवूडमध्ये देखील त्यांच्या गायनाचा मोलाचा वाटा आहे. अगदी ‘एक दुजे के लिए’ पासून ‘चेन्नई एक्सप्रेस’ पर्यंत त्यांच्या आवाजाने कमाल केली. कमल हसनचा यांचा अभिनय आणि SPB यांचं गाणं हे समीकरण भन्नाट होतं. एसपी अगदी शाहरूख, सलमान यांचाही आवाज झाले. ‘हम बने तुम बने…’, ‘पहला पहला प्यार..’, ‘मेरे रंग मे रंगने वाली..’, ‘साथिया तुने क्या किया…’, ‘तेरे मेरे बिच में..’ कबूतर जा जा..’ ‘रोजा जानेमन..’ एक नव्हे अशी हजारो अजरामर गाणी त्यांनी गायली आहेत.

देशातील महत्त्वाच्या नागरी पुरस्कारांनी देखील त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. 2001 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला होता, तर 2011 मध्ये त्यांना पद्म भुषण देऊन गौरवण्यात आले आहे. संगीतकार-गायक असणाऱ्या एसपीबी यांनी डबिंगमध्ये देखील रुची दाखवली होती. विविध कलाकारांसाठी विविध भाषांमध्ये त्यांनी डबिंग केले होते. त्यांनी एक अभिनेता, निर्माता, संगीतकार, स्टेज परफॉर्मर या जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या