Daughter’s Day 2020: राष्ट्रीय कन्या दिवस आणि त्याचे महत्त्व

    0
    383

    मुली या घराचं चैतन्य असतात. मुलगी घरात असल्याने घरातील वातावरण नेहमीच आनंदी आणि उत्साही राहते. प्रत्येक पालकांच्या मनांत त्यांच्या मुलीसाठी एक हळवा कोपरा असतो. तसंच मुलगी झाली की लक्ष्मी आली असं आपल्याकडं म्हटलं जातं. सप्टेंबर महिन्याच्या चौथ्या रविवारी राष्ट्रीय कन्या दिन (National Daughter’s Day) साजरा केला जातो. मुलींप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

    प्राचीन काळापासून स्त्रीयांना समाजात दुय्यम वागणूक देण्यात येत आहे. ज्यामुळे स्त्रीयांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. स्त्री भ्रूण हत्या, बालविवाह, अत्याचार,अन्याय याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यासाठी स्त्रीयांना मानसन्मान मिळवून देण्यासाठी ‘कन्या दिन’ साजरा केला जातो. स्त्रीच्या जन्माआधीच गर्भातच तिची हत्या केली जाते. स्त्री भ्रूण हत्या थांबविण्यासाठी, लोकांच्या मनात स्वतःच्या मुलींबद्दल प्रेम वाढण्यासाठी कन्या दिवस साजरा केला जातो.

    राष्ट्रीय कन्या दिनाचं महत्त्व:
    आता मुलींनीही आपली क्षमता, सामर्थ्य प्रत्येक क्षेत्रात सिद्ध केलं आहे. परंतु, ग्रामीण भागात आजही मुलीचा जन्म फारसा आनंदात साजरा होत नाही. मुलगी ही कुटुंबावर ओझं असते, असेच मानले जाते. असे असले तरी समाजातील स्त्रीयांचे योगदान दुर्लक्षित करता येणार नाही. त्यामुळे मुलीला वाढवताना कोणतीही वेगळी वागणूक मिळू नये किंवा दिली जावू नये. त्यांच्या क्षमतांवर विश्वास ठेऊन त्यांच्या प्रगतीसाठी पालकांनीही त्यांना प्रोत्साहित करावे.

    मुलगी हा परमेश्वराचा आशीर्वाद असतो, असे मानले जाते. त्यामुळे वर्षातील एक दिवस तिच्यासाठी समर्पित करण्यात आला आहे. पुरुषप्रधान संस्कृतीत मुलींना दुय्यम स्थान दिले जाते. मुलींना ओझे मानले जाते. त्यामुळे काही देशांनी मुलींना समान अधिकार मिळण्यासाठी Daughter’s Day राष्ट्रीय स्तरावर स्वीकारून तो साजरा करण्याचा निर्णय घेतला.

    कसा साजरा कराल:-

    तुमच्या मुलींना तुम्ही तिच्या आवडती गोष्ट भेटवस्तू म्हणून देऊ शकता. तसेच तिला आवडणारा पदार्थ करून आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. तसेच मुलींनाही मुलासारखी समान वागणूक देऊन तीला उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करा. त्यांना जे करायचे आहे ते करण्यासाठी पाठींबा द्या. आज मुलीही मुलासारखी प्रगती करत असून फक्त त्यांना योग्य वाटचाल दाखवण्याची समाजाला गरज आहे.

    लेक असते ईश्वराचं देणं,

    तिच्या  पाऊलखुणांनी सुखी होईल आमचं जिणं…

    कन्या दिनाच्या शुभेच्छा..!!