अनलॉक ५.० : राज्यात रेस्टॉरंट ऑक्टोबरपासून सुरु होण्याची शक्यता

0
241

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून रेस्टॉरंट सुरु होण्याची शक्यता आहे. आज मुख्यमंत्री आणि रेस्टॉरंट असोसिएशनच्या प्रतिनिधींसोबत चर्चा केली. त्यावेळी रेस्टॉरंट सुरु करण्याची कार्यपद्धती आधी ठरवली जाईल आणि त्यानंतर निर्णय घेतला जाईल, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक खबरदारी घेणार असाल तर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून मी हॉटेल सुरु करण्यासाठी परवानगी देतो. मात्र, एकदा हॉटेल सुरु केल्यावर ते पुन्हा बंद करावे लागणार नाहीत, याची जबाबदारी हॉटेल मालक आणि चालकांवर असेल, असं मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं.

आज मुख्यमंत्र्यांनी राज्यातील औरंगाबाद, पुणे, मुंबई आणि नागपूर येथील रेस्टॉरंट व्यवसायिक संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत चर्चा केली त्यावेळी ते बोलत होते. कोरोनाचे संकट मोठे असून या संकटकाळात हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायिक शासनासोबत असल्याचे समाधान वाटत असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. करोनावर अजूनही लस वा औषधी उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे करोनासोबत जगताना काळजीपूर्वक पुढे जावे लागत आहे. रुग्णांमध्ये करोनानंतरची लक्षणंही दिसून येत असून, आर्थिक बाबींसाठी सरकारनं काही पावलं टाकायला सुरूवात केली आहे. आतापर्यंत अनेक व्यवहार बंद होते. त्यानंतर आता एकपाठोपाठ सुरू करत आहोत. राज्य शासनानं रेस्टॉरंट सुरू करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे तयार केली आहेत. ती सर्व संबंधितांना पाठवण्यात आली आहेत. ती अंतिम झाल्यानंतर रेस्टॉरंट सुरू करण्याबाबचा निर्णय घेतला जाईल,” असं मुख्यमंत्री म्हणाले.

हॉटेल सुरु केल्यानंतर ते पुन्हा बंद करावे लागणार नाही याची जबाबदारी हॉटेल मालकांवर असेल. हॉटेल मालकच माझे कॅमेरा आहेत. त्यांनीच मला सांगायला पाहिजं की आम्हाला कोरोना नियंत्रण करायचं आहे. थोडे दिवस थांबा. तुम्ही परवानगी द्या. एकदा का हॉटेल सुरु केलं, तर जबाबदारीने चालवले पाहिजे. हॉटेल मालकांनी पुन्हा एकदा विचार करावा आणि हॉटेल कसे चालवणार याची विशेष पद्धत (SOP) सरकारला द्यावी. आणखी काही सूचना असतील तर जरुर करा. पण एकदा हॉटेल सुरू केल्यानंतर मी तुमच्याकडे बघायला येणार नाही. तुम्ही माझे परिवार-सहकारी म्हणून काम केलं पाहिजे. मी कुणावर पाळत ठेवणार नाही,” असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

ऑक्टोबरच्या सुरुवातीला राज्यात रेस्टॉरंट्स सुरु करण्याचा निर्णय सरकार घेण्याची शक्यता आहे. त्यासाठी आधी कार्यपद्धती ठरवण्यात येणार आहे. नेमके रेस्टॉरंट्स कसे सुरु करण्यात येतील? किती टक्के ग्राहकांना रेस्टॉरंट्समध्ये जाण्याची परवानगी असेल? तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक नियमांचं काटेकोरपणे पालन करत सरकार ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून रेस्टॉरंट्स सुरु करण्यासाठी परवानगी देण्याची शक्यता आहे. त्यासाठी नियमावलीही तयार करण्यात येणार आहे.