२८ वर्षांनी निकाल: बाबरी मशीद विध्वंस प्रकरणातील सर्व 32 आरोपी निर्दोष

0
540

बाबरी मशीद विद्ध्वंस प्रकरणात सीबीआयच्या (CBI) विशेष कोर्टाचा निकाल तब्बल 28 वर्षांनी आला आहे. 1 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येत घडलेल्या विद्ध्वंसप्रकरणी कोर्टाने निर्णय दिला. याप्रकरणी भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्यासह सर्व 32 आरोपींना कोर्टाने निर्दोष मुक्त केले. बाबरी मशीद विध्वंस पूर्वनियोजित कट नव्हता, असा निर्वाळा लखनौ कोर्टाने दिला आहे. या प्रकरणात साक्षीदार प्रबळ नव्हते असे कोर्टाने म्हटलं आहे. ही घटना अचानक घडली असं देखील कोर्टानं म्हटलं आहे.

२७ ऑगस्ट १९९३ पासून सीबीआय या प्रकरणी तपास करीत आहे. ही घटना म्हणजे सुनियोजीत कट असल्याचं सीबीआयने तपासात म्हटलं होतं. सीबीआयने ३५१ साक्षीदार आणि सुमारे ६०० कागदपत्र पुरावा म्हणून सादर केले आहेत. १९ एप्रिल २०१७ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी सुनावणी घेण्याचे आदेश दिले होते. ४८ जणांविरोधात आरोप निश्चित करण्यात आले होते मात्र त्यापैकी १६ जण खटला सुरु असताना मरण पावले. १६ व्या शतकातील ही मशीद पाडण्यासाठी आरोपींनी कारस्थान रचले आणि कारसेवकांना मशीद पाडण्यासाठी फूस लावली असा सीबीआयचा युक्तिवाद होता.

न्यायालयात निकाल सुनावला जात असताना लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, कल्याण सिंह, सतीश प्रधान आणि महंत नृत्यगोपाल दास यांच्याव्यतिरिक्त सर्वजण उपस्थित होते. अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना प्रकृतीच्या कारणास्तव गैरहजर राहण्याची मुभा देण्यात आली. तर उमा भारती यांना करोनाची लागण झाली असून, कल्याण सिंह सध्या उपचार घेत आहेत. एकूण २६ आरोपी कोर्टात हजर होते. यामध्ये साध्वी ऋतंभरा, चंपत राय, विनय कटियार, ब्रिजमोहन शरण सिंग आणि इतर जणांचा समावेश होता.

हे होते बाबरी मशीद प्रकरणातील 32 निर्दोष मुक्त आरोपी

लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, कल्याण सिंह, उमा भारती, विनय कटियार, साध्वी ऋतंभरा, महंत नृत्य गोपाल दास, डॉ. राम विलास वेदांती, चंपत राय, महंत धर्मदास, सतीश प्रधान, पवन कुमार पांडे, लल्लू सिंह, प्रकाश शर्मा, विजय बहादुरसिंग, संतोष दुबे, गांधी यादव, रामजी गुप्ता, ब्रजभूषण शरण सिंह, कमलेश त्रिपाठी, रामचंद्र खत्री, जय भगवान गोयल, ओम प्रकाश पांडे, अमर नाथ गोयल, जयभानसिंग पवईया, महाराज स्वामी साक्षी, विनय कुमार राय, नवीन भाई शुक्ला , आरएन श्रीवास्तव, आचार्य धर्मेंद्र देव, सुधीरकुमार कक्कर आणि धर्मेंद्रसिंग गुर्जर.

6 डिसेंबर 1992 रोजी नेमकं काय घडलं?

अयोध्येत 6 डिसेंबर 1992 लाखोंच्या संख्येने हिंदू कारसेवकांनी बाबरी मशिदीचा घुमट पाडला. त्यावेळी उत्तर प्रदेशात कल्याण सिंह यांचं सरकार होतं, जे सध्या राजस्थानचे राज्यपाल आहेत. देशभरातून लाखोंच्या संख्येने कारसेवक अयोध्येत दाखल झाले होते. यांमध्ये विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांचा समावेश होता. सकाळी साडे दहा वाजता हजारो कारसेवकांनी बाबरी मशिदीला वेढा घातला आणि घुमटापर्यंत पोहोचले. प्रत्येकाच्या मुखात त्यावेळी ‘जय श्री राम’चा नारा होता.अयोध्येतील वादग्रस्त वास्तूपर्यंत पोहचलेला जमाव नियंत्रणाबाहेर गेला होता. वादग्रस्त वास्तूजवळ जवळपास दीड लाख कारसेवक जमा झाले होते. त्यामुळे वास्तूच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला. त्यावेळी अयोध्येतील परिस्थिती भयंकर झाली होती.

गोळी न चालवण्याचे कल्याण सिंह यांनी दिले होते आदेश

यावेळी कारसेवकांवर कुणीही गोळी चालवणार नाही असे आदेश मुख्यमंत्री कल्याण सिंह यांनी दिले होते. त्यावेळी अयोध्येत येणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी 10 हजार पोलीस तैनातदुपारी 3 वाजून 40 मिनिटांनी पहिला घुमट तोडण्यात आला. 4.55 वाजता संपूर्ण वादग्रस्त वास्तू जमीनदोस्त. कारसेवकांनी त्याच जागी पूजा करून रामलल्लाची स्थापना केली.