हाथरस प्रकरण : पिडीत तरुणीवर बलात्कार; याला जबाबदार कोण?

0
360

उत्तर प्रदेशात हाथरस येथे घडलेला सगळा प्रकारच अत्यंत वेदना देणारा असा आहे. उत्तर प्रदेशातील हाथरस घटनेत महिलेवर बलात्कार करणारे हे पशूच होते. उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणीचा दोन आठवड्यानंतर मंगळवारी सकाळी उपचारांदरम्यान मृत्यू झाला. पीडित तरुणीला आधी अलिगड मुस्लिम विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले. नंतर तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे लक्षात घेऊन तिला सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र या पीडितेला वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आले. दिल्लीतील निर्भया प्रकरणासारखे हे प्रकरण असून यात चार तरुणांनी एका तरूणीवर बलात्कार करुन, तिची जीभ छाटून तिची मान मोडल्याचा अत्यंत संतापजनक व अमानुष प्रकार घडला आहे.

मुलीला बलात्कारानंतर बेदम मारहाण करण्यात आली होती, इतकेच नव्हे तर तिची जीभ कापून पाठीचे हाड मोडले होते. हाथरसच्या चंदपा भागात आईसह चारा आणण्यासाठी गेलेल्या तरुणीवर गावातीलच ४ नराधमांनी बलात्कार केला. त्यानंतर त्यांनी तरुणीला ठार मारण्याचा प्रयत्न केला.

गेले अनेक दिवस ही तरुणी मृत्यूशी झुंज देत होती. मुलीच्या प्रकृतीत काहीच सुधारणा न झाल्याने तिला सोमवारी दिल्लीत एम्समध्ये हलवण्यात आले होते. पण तेथेही प्रकृतीमध्ये सुधारणा न झाल्याने तिला सफदरजंग मध्ये हलवण्यात आले. त्यापूर्वी तिला अलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

आरोपींनी तर हे असे अमानुष वाईट कृत्य केलेच पण प्रशासन आणि तेथील सिस्टीमनेही त्या बिचाऱ्या मुलीवर आणि तिच्या कुटूंबियावर एकप्रकारे अन्याय केला. कुटूंबियांना न कळवता पहाटे अडीच वाजता त्या मुलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. तिच्या आईला आणि कुटूंबियांना शेवटचे दर्शनही त्यांनी घेऊन दिले नाही. घटना घडून दोन आठवड्यापेक्षा जास्त काळ लोटला तरी अजूनही हवी तशी कारवाई पोलीस यंत्रणेकडून करण्यात आलेली नाही आहे.