राज्यात ९ ऑक्टोबरपासून 5 विशेष गाड्या धावणार;मध्य रेल्वेचा निर्णय

0
253

करोनाच्या वाढत्या प्रसाराचा धोका लक्षात घेत बंद करण्यात आलेली प्रवासी रेल्वेसेवा हळूहळू रूळावर येत आहे. ज्यातील प्रवासी वाहतूक सुरळीत करण्यासाठी राज्य सरकारनं रेल्वे सेवा सुरू करण्यास परवानगी दिली होती. त्यानंतर मध्य रेल्वेनं आज महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातंर्गत रेल्वेसेवा सुरू करण्यास मिशन बिगिन अगेनच्या पाचव्या टप्प्यात परवानगी दिली होती. त्यानंतर पाच जिल्ह्यादरम्यान विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्याचा निर्णय मध्य रेल्वेनं घेतला आहे. या रेल्वे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नागपूर, पुणे, गोंदिया व सोलापूर या जिल्ह्यांच्या दरम्यान धावणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेनं दिली आहे.

९ ऑक्टोबरपासून रेल्वेसेवा सुरू होणार आहे. दररोज दोन्ही बाजूंकडून पाच स्पेशल ट्रेन धावणार आहे. या रेल्वे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नागपूर, पुणे, गोंदिया व सोलापूर या जिल्ह्यांच्या दरम्यान धावणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेनं दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- नागपूर (गाडी क्रमांक ०२२८९) ही १० ऑक्टोबर, तर नागपूर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई (गाडी क्रमांक ०२२९०) दुरंतो एक्स्प्रेस ही गाडी ९ ऑक्टोबरपासून दररोज धावणार आहे.

सीएसएमटी- गोंदिया (गाडी क्रमांक ०२१०५) ही ट्रेन ९ ऑक्टोबर, तर गोंदिया- सीएसएमटी (गाडी क्रमांक ०२१०६) विदर्भ एक्स्प्रेस ही गाडी १० ऑक्टोबरपासून दररोज धावणार आहे. या दोन्ही रेल्वेगाड्या सुरू होत असल्याने प्रवाशांना ये-जा करणे सुकर होणार आहे. पूर्वीच्याच रेल्वेस्थानकावर दुरंतो, विदर्भ एक्स्प्रेसला थांबा असणार आहे. आरक्षण तिकीट घेऊनच प्रवास करावा लागेल, अशी माहिती बडनेरा रेल्वेस्थानकाचे मुख्य खंड वाणिज्य निरीक्षक शरद सयाम यांनी दिली. अहमदाबाद, मुंबईकडे ये-जा करण्यासाठी हावडा- मुंबई मेल, हावडा- अहमदाबाद एक्स्प्रेसदेखील आता दररोज सुरू आहे.