कारभारी लयभारी’ झी मराठीची नवीन मालिका; निखिल चव्हाण प्रमुख भूमिकेत

0
383

सध्या सगळीकडे चर्चा आहे ती, ‘कारभारी लयभारी’ या मालिकेच्या प्रोमोची… झी मराठीवर ‘कारभारी लयभारी’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेच्या प्रोमोत एका राजकीय पक्षाची सभा आणि त्या सभेला संबोधित करणारा नेता दाखवण्यात आला आहे. भर पावसात एक नेता सभेला संबोधित करत आहे. ‘अरे ही माणसं आमची आहेत. हा महाराष्ट्र आमचा आहे. मग सत्ता पण आमची. आम्ही का जायचं त्यांच्या दारात; ते येतील आमच्या दारी. आम्ही इथले कारभारी…. ‘ असे या भाषणातील बोल आहे.

‘ही मालिका राजकारणावर आधारित असून यात मुख्य भूमिकेत कोणता कलाकार झळकणार याविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता दाटली होती. मात्र, अलिकडेच या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला असून हळूहळू प्रत्येक प्रश्नावरुन पडदा दूर होत असल्याचं दिसून येत आहे. ‘कारभारी लयभारी’ या मालिकेमध्ये अभिनेता निखिल चव्हाण मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तर या मालिकेचं दिग्दर्शन इंद्रजीत भोसले यांनी केलं आहे. राजकारणाची जोड असणारी एक प्रेमकहाणी आहे हेसुद्धा प्रोमो पाहून लक्षात येत आहे. तेव्हा आता प्रेम आणि राजकारणाची सांगड घालणारी ही मालिका येत्या काळात प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडण्यात कितपत यशस्वी ठरते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये निखिल पहिल्यांदाच एका वेगळ्या रुपात प्रेक्षकांसमोर येत असल्याचं दिसून येत आहे. त्याची बोलण्याची पद्धत, पेहराव आणि भाषण करण्याची स्टाइल अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. तसंच या मालिकेत राजकारणाची जोड असणारी प्रेमकहाणी पाहायला मिळणार असल्याचं दिसून येत आहे.दरम्यान, या मालिकेविषयी अद्याप अनेक गोष्टी गुलदस्त्यात आहेत.