जागतिक टपाल दिन विशेष : माझ्या मामाचे पत्र कुठेतरी हरवले

0
935

जगभरामध्ये 9 ऑक्टोबर हा दिवस जागतिक टपाल दिन (World Post Day) म्हणून साजरा केला जातो.मनातल्या भावना व्यक्त करण्याचं साधन म्हणजे पत्र. खरे तर पूर्वीच्या काळी पत्र आलं की खूप भारी वाटायचे. पत्राद्वारे एक दुसऱ्याची सुख दुःख कळत असत. एक काळ असो होता जेव्हा लोक दिवस-रात्र पत्रांची वाट पाहत असे, पण इंटरनेटमुळं हा पत्रसंवाद हरवलाय. आजच्या पिढीला पत्र किंवा टपाल काय असते तेच समजत नाही आहे.

टपाल व्यवस्थेबद्दल:

आज आंतरराष्ट्रीय टपाल दिवस आहे. 1969 पासून आंतरराष्ट्रीय टपाल दिन 9 ऑक्टोंबर रोजी साजरा केला जात आहे. १५० वर्षाहून अधिक काळ जगातील सर्वात मोठे टपाल सेवेचे नेटवर्क म्हणून भारतीय टपाल कार्यालयाची ओळख आहे. भारतात एकूण टपाल कार्यालये १,५४,९१० यापैकी शहरी १५,९५५ तर ग्रामीण १,३८,९५५ कार्यालये आहेत. यापैकी विभागीय टपाल कार्यालये २५,५६४ तर ग्रामीण डाक सेवक टपाल कार्यालये १,२९,३४६ , ग्रामीण डाक सेवक २,५५,०२९ आणि टपाल अधिकारी कर्मचारी १,९३,८११ इतके कार्यरत आहेत. मोठ‌्या प्रमाणात असलेल्या कर्मचाऱ्यांसमवेत टपाल सेवा देशाच्या संपर्काचा आधार आहे आणि देशाच्या सामाजिक व आर्थिक विकासातील महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

जुन्या काळातील पोस्ट ऑफिस आणि सध्याचे पोस्ट ऑफिस मधे अमुलाग्र बदल झाल्याचे अनुभवण्यास मिळते.या सेवां सोबत पोस्टाची बँकिंग सेवा सुद्धा चांगली आहे.आजही सुरक्षित ठेव ठेवायची असेल तर पोस्टासारखा उत्तम पर्याय नाही असे जाणकार आणि तज्ञ मंडळीचे मत आहे आणि ते खरेही आहे. बचत बँक,आरडी,मुदतठेव,वरिष्ठ नागरिक योजना,पीपीएफ, मंथली इनकम स्कीम,राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र हे सर्व व्यवहार आता ऑनलाइन पद्धतीने केली जातात त्यामुळे या कामातही पारदर्शीपणा आपसुकंच आला आहे.कामामधे सुसुत्रता येत चालली आहे.याशिवाय मनरेगा सारख्या योजना अतिशय प्रभावीपणे टपाल खात्या मार्फ़त चालु आहेत.

करोना संसर्गामुळे सारे काही लॉकडाऊन असताना राज्यातील पोस्ट कार्यालये मात्र अनेकांच्या मदतीला धावले. लॉकडाऊन काळात राज्यात साधारणता दहा हजार कोटींची देवाण घेवाण करत दीड कोटीपेक्षा अधिक लोकांना पोस्टाने आधार दिला. विशेषता ज्येष्ठांना पेन्शन थेट घरी पोहोचवतानाच ३६ हजार औषधांचे पार्सल पोहोचवत रूग्णांच्या उपचारासाठी कर्मचाऱ्यांनी मोलाची कामगिरी बजावली.

गावातील आठवणी :-

मात्र आजच्या युवा पिढीला पत्र, पोस्टकार्ड आणि ग्रिटिंगचे महत्त्व हवे तेवढे वाटत नाही. एकेकाळी लोकांसाठी पत्र म्हणजेच सर्वकाही असे. 20-25 वर्षांपुर्वी पत्र हे अनेकांच्या आयुष्याची लाइफ लाइन होते. मागील 20 वर्षांपासून पत्रांचा वापर कमी होत गेला आहे. आज पत्रांची जागा ई-मेल आणि सोशल मीडियाने घेतली आहे. लोक लांब असले तरीही पत्राद्वारे प्रेम व्यक्त करत असे, मात्र आज लोक आधुनिक तर होत आहेत, मात्र एकमेंकांपासून लांब जात आहेत.

पत्राचे महत्त्व हे त्यावेळी सिनेमातूनही समजायचे. सिनेमातील ‘कबुतर जा जा जा…’, ‘संदेसे आते है…’, ‘चिठ्ठी आई है आई है…’, ‘लिखे जो खत तुझे…’ अशी अनेक गाणी पत्रामुळे आणि पत्राच्या तेव्हाच्या महत्वामुळे अजरामर झाली. आजच्या काळात अशी गाणी लिहीता येणार नाही.

मी वाडा या गावी असताना आम्हाला आमच्या नातेवाईकांकडून तसेच रक्षाबंधनला बहिणीकडून पत्र यायची. त्यावेळी पत्रासोबत मायेचा ओलावा आणि प्रेमाची ऊबही मिळायची. कुणाला नोकरी लागली तर कुणाचे लग्न ठरले हे सर्व त्यावेळी पत्राद्वारे समजायचे. गावी पोस्टमन काका दिसले की आम्ही सर्व मुले त्यांच्यामागे धावायचो. काय भन्नाट दिवस होते ते. शाळेमध्येही त्यावेळी एक खेळ खेळायचो तो म्हणजे “मामाचे पत्र हरविले”. खरेच पत्रव्यवहार असेच पूर्वीसारखे सुरु झाले तर किती छान होईल ना. त्यावेळच्या पत्राची मजा मात्र आताच्या सोशल मीडियातून येत नाही हे मात्र खरे. पत्रासोबतचा मायेचा ओलावा आता सोशल मीडियाच्या युगात नाहीसा झालाय.