बाळासाहेब विखे पाटील यांच्या आत्मचरित्राचे मोदींच्या हस्ते प्रकाशन

0
300

पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांच्याहस्ते आज स्वर्गीय पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या ‘देह वेचावा कारणी’ या आत्मकथेचं प्रकाशन करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराज आणि अनेक वीरांची पावनभूमी असलेल्या महाराष्ट्राला वंदन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणाची सुरूवात केली.  व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांनी या आत्मचरित्राचे प्रकाशन केले आहे. डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांचे गाव आणि गोरगरीबांच्या विकासासाठी आणि शिक्षणाबद्दलचे योगदान असो किंवा महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील यशासाठी त्यांनी केलेले प्रयत्न असो, त्यांचे कार्य पिढ्यांना प्रेरणा देईल, असे उद्घार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी काढले. तसेच विखे पाटील यांच्या सन्मानार्थ प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे नामांतर करुन, त्या संस्थेला ‘लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था’ असे नाव देण्यात आले.

पंतप्रधान मोदी या कार्यक्रमात संबोधन करताना म्हणाले की, ‘बाळासाहेब विखे पाटील यांनी महाराष्ट्रचं नाहीतर देशाच्या अनेक भागात मंत्रिपदाच्या काळात काम केलं. ज्या काळात ग्रामीण भागांत शिक्षणाची चर्चाही होत नव्हती, आशा काळात त्यांनी शिक्षण संस्था सुरु केल्या. साखर उद्योगला चालना दिली. शेतकऱ्यांना प्रशिक्षित केले, शेतकऱ्यांची उत्पादकता, उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न केले. नव्या जुन्याचा मेळ घालून शेती केली पाहिजे. इथेनॉलचा वापर जसाजसा वाढेल तसा तेलासाठी बाहेर जाणारा पैसा शेतकऱ्यांना मिळेल, हे त्यांनी दाखवून दिलं.’

“बाळासाहेब विखे पाटील यांनी नेहमीच सत्ता आणि राजकारणाच्या माध्यमातून समाजाच्या भल्याचा प्रयत्न केला. राजकारणाच्या माध्यमातून समाजात बदल कसा घडवून आणता येईल, गाव आणि गरीबांच्या समस्या कशा सोडवता येतील, यावर त्यांनी नेहमी भर दिला. बाळासाहेब विखे पाटील यांचा विचारांमुळे इतरांपासून ते वेगळे ठरतात” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

“आजही त्यांचा प्रत्येक पक्षात सन्मान होतो. गाव, गरीबाच्या विकासाठी त्यांनी जे कार्य केले, ते पुढच्या पिढ्यांना प्रेरणा देईल. बाळासाहेबांनी गरीबाचे दु:ख जवळून पाहिले, समजून घेतले व त्यांच्या भल्यासाठी काम केले” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

“आज शेती आणि शेतकऱ्याला अन्नदाताच्या भूमिकेतून पुढे नेऊन, उद्योजक बनवण्यासाठी संधी निर्माण केली जात आहे. एमएसपी असो किंवा यूरिया नीम कोटिंग आज सरकार शेतकऱ्यांच्या छोटया-छोटया अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करत आहे” असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ऑनलाईन उपस्थित होते. त्यांनी विखेंबद्ल आपले विचार व्यक्त केले. प्रवरानगर येथे मंत्री रावसाहेब दानवे, माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुभाष भामरे, हरीभाऊ बागडे, हर्षवर्धन पाटील, सुनंदा पवार, प्राजक्त तनपुरे, पोपटराव पवार, सुरेश धस, वैभव पिचड,बबनराव पाचपुते, खासदार सुजय विखे, खासदार प्रितम मुंडे, धैर्यशील माने हे उपस्थित होते.