#BoycottTanishq ट्विटरवर ट्रेण्ड; तनिष्कच्या जाहिरातीला का केले जातेय ट्रोल?

0
418

आगामी दसरा, दिवाळीनिमित्त तनिष्क ज्वेलरी कंपनीने प्रसारीत केलेली जाहिरात लव जिहादला प्रोत्साहन देणारी आहे, असा आरोप करुन तनिष्क कंपनीला आणि त्यांच्या जाहिरातीला ट्रोल केले जात आहे. परिणामी ही जाहिरात वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. एवढंच नाहीतर हा वाद आता सोशल मीडियापर्यंत पोहोचला आहे. सोशल मीडियावर तनिष्कला ट्रोल केलं जाऊ लागलं आहे. तसेच तनिष्क बॉयकॉट करण्याची मागणी नेटकऱ्यांकडून केली जाऊ लागली आहे. सोमवारी ट्विटरवर संपूर्ण दिवस #BoycottTanishq हा हॅशटॅग ट्रेण्ड करत होता. त्यानंतर कंपनीने प्रदर्शित केलेली आपल्या ब्रँडची जाहीरात मागे घेतली आहे.

कंपनीने जाहिरात मागे घेतली

सोमवारी ट्विटरवर संपूर्ण दिवस #BoycottTanishq हा हॅशटॅग ट्रेण्ड करीत होता. त्यानंतर कंपनीने प्रदर्शित केलेली आपल्या ब्रँडची जाहीरात मागे घेतली आहे. दरम्यान, कंपनीने आगामी दसरा, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आपल्या दागिन्यांच्या प्रमोशनसाठी मागील आठवड्यात एक जाहिरात प्रदर्शित केली होती. परंतु, व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी या जाहिराती विरोधात मोहीम सुरु केली आणि #BoycottTanishq हॅशटॅग ट्रेण्ड होऊ लागला. अनेकांनी तनिष्कने प्रदर्शित केलेली जाहिरात ही लव जिहादला प्रोत्साहन देणारी असल्याचा दावा केला. तसेच ही जाहिरात लवकरात लवकर बंद करावी, अशी मागणीही केली आहे.

काय आहे तनिष्कची जाहिरात:

तनिष्कच्या जाहिरातीमध्ये एक हिंदू महिला दाखवण्यात आली आहे. जिने मुस्लिम कुटुंबातील मुलाशी लग्न केलं आहे. व्हिडिओत ही महिला गरोदर असून तिचे डोहाळे जेवणाचा कार्यक्रम दिसत आहे. मुस्लिम कुटुंबात ही पद्धत नाही. त्यामुळे ती आपल्या सासूला हा प्रश्न विचारते. ‘आई आपल्या घरात ही पद्धत नाही तरी आपण?’ त्यावर सासू उत्तर देते की, ही पद्धत आपल्यात नाही पण मुलगी खूष राहणं जास्त महत्वाचं आहे. हिंदू-मुस्लिम कुटुंबात एकजूट दाखवण्याचा या व्हिडिओतून प्रयत्न केला गेला आहे.

या व्हिडिओला सोशल मीडियावर पसंत करण्यात आलं नाही. या व्हिडिओवरून लव-जिहाद मुद्दा देखील समोर आला. जाहिरात वेगळी आणि रिऍलिटी वेगळी आहे. त्यामुळे तनिष्कने देखील ही जाहिरात सोशल मीडियावरून काढली टाकली आहे. दरम्यान काही युजर्स #BoycottTanishq ची मागणी करणाऱ्या लोकांवर टीका करत आहेत.