जागतिक विद्यार्थी दिवस साजरा करण्यामागे काय कारण आहे?

0
870

जागतिक विद्यार्थी दिवस हा भारताचे माजी राष्ट्रपती आणि विख्यात अंतराळ शास्त्रज्ञ एपीजे अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस भारतासह सर्व जगात पाळला जातो. एपीजे अब्दुल कलाम हे विद्यार्थी प्रिय असे राष्ट्रपती होते. संयुक्त राष्ट्रांनी 2010 मध्ये एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस ‘जागतिक विद्यार्थी दिन’ म्हणून घोषित केला. अब्दुल कलाम नेहमी विद्यार्थ्यांमध्ये मिसळून त्यांच्याशी संवाद साधत असत.

तसंच जगभरातील विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रमांच कौतुक करण्यासाठी हा दिवस साजरा करतात. ‘मिसाईल मॅन’ म्हणून ओळख असणाऱ्या अब्दुल कलामांची प्रेरणा जगभरातील विद्यार्थ्यांना मिळावी, यासाठी देखील हा दिवसात साजरा करतात. सगळ्यात पहिल्यांदा 2010 मध्ये युनायटेड नेशनने हा दिवस साजरा केला होता. विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर देशाच्या विकासाचे भवितव्य अवलंबून असतं. त्यामुळे विद्यार्थ्यांना समर्पित करणारा एक दिवस असायला हवा. त्यासाठी विद्यार्थी दिन साजरा केला जातो. तसंच विद्यार्थ्यांना महत्त्व देणे आणि त्यांचे समाजातील महत्त्व जाणणे हे या दिवसाचे उद्दिष्ट आहे.

ए.पी.जे अब्दुल कलाम यांना त्यांच्या कामासाठी वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. चाळीस विद्यापीठांकडून त्यांना सात डॉक्टरेट पदव्या मिळाल्या आहेत. भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न देखील ए.पी.जे अब्दुल कलाम यांना मिळाला आहे.

भारतरत्न पुरस्कार मिळवणारे ते भारताचे तिसरे राष्ट्रपती ठरले. या अगोदर हा पुरस्कार डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आणि डॉक्टर झाकीर हुसेन यांना मिळाला होता. तसंच अब्दुल कलामांना पद्मभूषण आणि पद्मविभूषण हे देखील पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना १९८१ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर १९९० मध्ये इस्त्रो आणि डीआरडीओमधील कामांबद्दल पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. संरक्षण तंत्रज्ञानाचे आधुनिकीकरण आणि वैज्ञानिक संशोधनातील अतुलनीय योगदानासाठी त्यांना भारत रत्न पुरस्काराने १९९७ मध्ये सन्मानित करण्यात आले होते.