मुसळधार पावसाचा सामना करत सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाच्या टीमने केलं शूटिंग पूर्ण

0
722

अभिनेते प्रविण विठ्ठल तरडे लिखित, दिग्दर्शित ‘सरसेनापती हंबीरराव’ हा भव्य ऐतिहासिक चित्रपटांची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. कोणत्याही ऐतिहासिक चित्रपटाचे शूटिंग सलगपणे करणे निर्मात्याच्या दृष्टीने फायद्याचे ठरत असते, कारण मोठ्या ऐतिहासिक चित्रपटांसाठी उभारले जाणारे भव्य सेट, त्या काळाची वातावरण निर्मिती याचा मोठा खर्च असतो. सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचं दिग्दर्शन आणि लेखन प्रविण विठ्ठल तरडे यांनी केलं असून नुकतंच या चित्रपटाचं संपूर्ण चित्रीकरण पार पडलं आहे. या चित्रपटाचं जवळपास सगळं चित्रीकरण पूर्ण झालं होतं. मात्र, ऐनवेळी देशात लॉकडाउनची घोषणा झाली आणि चित्रपटाचं तीन दिवसांचं राहिलेलं चित्रीकरण अपूर्ण राहिलं.

जवळपास ७ महिन्यांनंतर चित्रीकरणाला परवानगी मिळाली. मात्र, परवानगी मिळाल्यानंतरही या चित्रीकरणात अनेक अडथळे आले. यातलचा एक अडथळा म्हणजे सलग काही दिवस कोसळत असलेला धो-धो पाऊस. भोर येथे नव्याने भव्य सेट उभारण्यात आला, सर्व तयारी झाली, शूटिंगला सुरुवात झाली आणि पावसाने जोरदार हजेरी लावत परत एकदा व्यत्यय आणला. मात्र ‘सरसेनापती हंबीरराव’च्या लढाऊ मावळ्यांनी आलेल्या संकटाशी दोन हात करत नियोजित शूटिंग मोठ्या जिद्दीने पूर्ण केलं. चित्रपटाच्या सेटवरील प्रत्येक व्यक्तीने योग्य नियोजन करत भर पावसात या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण केलं.

पावसाबरोबर यशस्वी मुकाबला करत शूटिंग पूर्ण करताना दिग्दर्शक प्रविण तरडे म्हणाले, ‘६ जून १६७४ साली छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला त्यावेळी पहाटे पाऊस पडला होता. आज शिवराज्याभिषेक सोहळा शूटिंग करतानाही पाऊस पडत आहे, या पावसामुळे शूटिंगमध्ये व्यत्यय निर्माण झाला तरी आम्ही ही बाब सकारात्मक म्हणून बघतो.’

याविषयी बोलताना निर्माते संदीप मोहिते-पाटील म्हणाले, ‘लॉकडाऊनमुळे तीन दिवसांचे शूटिंग बाकी होते. परवानगी मिळाल्यानंतर शूटिंग सुरू केले. मात्र ऐन शूटिंगच्या वेळी वादळी पावसाने हजेरी लावली. यामुळे शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या भव्य सेटचे मोठे नुकसान झाले असले तरी चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे, डिओपी महेश लिमये, अभिनेते उपेंद्र लिमये, रमेश परदेशी, सुनील अभ्यंकर, देवेंद्र गायकवाड, कार्यकारी निर्माते विशाल चांदणे यांच्यासह संपूर्ण टीम या संकटाशी यशस्वीपणे झुंजली. सरसेनापती हंबीरराव’ हा भव्य ऐतिहासिक मराठी चित्रपट जून २०२० मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.