MIvsKXP सुपर ओव्हरचा थरार: अप्रतिम गोलंदाजी आणि अफलातून क्षेत्ररक्षणाचा नजराणा

0
241

आयपीएल मध्ये काल झालेल्या सामन्यांमध्ये सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळला. रविवारी दुबईच्या मैदानावर मुंबई इंडियन्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब मध्ये ऐतिहासीक सामना रंगला होता. तर, रविवारी इतिहासात अनोखा रेकॉर्ड नोंदवण्यात आला. मुंबई विरूद्ध पंजाबच्या सामन्यात मुंबईने पंजाबला १७७/६ धावांच लक्ष दिलं. याचा पाठलाग करत किंग्स इलेव्हन पंजाबची १७६ धावा करून टाय झालं. यानंतर दोन सुपर ओव्हर झाली.

दुबईच्या मैदानावर निर्धारीत वेळेत सामना बरोबरीत सुटल्यानंतर सुपरओव्हर खेळवण्यात आली. मुंबईकडून जसप्रीत बुमराहने सुपरओव्हर टाकताना एका षटकात फक्त ५ धावा देत भेदक मारा केला. या षटकात बुमराहने २ बळीही मिळवले. त्यामुळे विजयासाठी अवघ्या ६ धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या मुंबईला विजयासाठी चांगली संधी होती. परंतू अनुभवी मोहम्मद शमीने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत मुंबईच्या फलंदाजांना मोठे फटके खेळण्याची संधी दिली नाही. अखेरच्या चेंडूवर विजयासाठी २ धावा हव्या असताना क्विंटन डी-कॉक धावबाद झाला आणि पहिली सुपरओव्हर अनिर्णित झाली.

दुसऱ्या सुपरओव्हरमध्ये हार्दिक पांड्या आणि कायरन पोलार्ड जोडी मैदानात उतरली. पोलार्डने फटकेबाजी करत मुंबईला दुसऱ्या सुपरओव्हरमध्ये ११ धावा काढून दिल्या. विजयासाठी आवश्यक असलेल्या १२ धावांचं आव्हान पंजाबकडून ख्रिस गेल आणि मयांक अग्रवाल मैदानात उतरले. मुंबईने ट्रेंट बोल्टला दुसरी सुपरओव्हर टाकण्याची संधी दिली. बोल्टच्या पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकत गेलने धडाकेबाज सुरुवात केली. यानंतर मयांक अग्रवालने गेलचा कित्ता गिरवत पंजाबच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. एकाच दिवशी दोन सामन्यांना निकाल सुपरओव्हरवर लागण्याचा आणि पहिली सुपरओव्हर अनिर्णित राहण्याची आयपीएलच्या इतिहासातली पहिली वेळ ठरली आहे.

मयांक अग्रवालचे अफलातून क्षेत्ररक्षण:

सऱ्या सुपरओव्हरमध्ये मुंबईकडून कायरन पोलार्ड आणि हार्दिक पांड्या हे फलंदाज मैदानावर उतरले. यादरम्यान पोलार्डने फटकेबाजी करत मुंबई पंजाबसमोर आव्हानात्मक धावसंख्या उभी करेल याची काळजी घेतली. ख्रिस जॉर्डन टाकत असलेल्या सुपरओव्हरच्या अखेरच्या चेंडूवर पोलार्डने मोठा फटका मारला. चेंडू सीमारेषेबाहेर जाणार असं वाटत असतानाच मयांक अग्रवालने उडी मारून चेंडू हवेतूनच आत ढकलला आणि संघासाठी महत्वाच्या धावा वाचवल्या. मयंक अग्रवालने आपल्या संघासाठी चार धावा वाचवल्या आणि क्षेत्ररक्षणातील त्याच्या याच प्रयत्नाने सामन्याचा निकाल बदलला.

आज क्रिकेट जिंकले:

आयपीएल मधील दोन सुपर ओव्हरचा थरार पाहिला असता मुंबई आणि पंजाब ह्या दोन्ही संघानी विजयासाठी शर्थीने प्रयत्न केला. दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये पंजाबने जरी बाजी मारली असली तर आज खरा विजय क्रिकेटचा झाला. दोन्ही संघाची गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण सर्वात्तम होते. त्यामुळे आज खरोखर क्रिकेट जिंकले आणि आयपीएल स्पर्धा ही जगातली सर्वांच्या आवडती लीग का आहे ह्याचीही प्रचिती आली.