DDLJ ला २५ वर्ष पुर्ण; लंडनच्या लिसेस्टर स्क्वेअरवर उभा राहणार शाहरुख-काजोलचा कांस्य पुतळा

0
322

90 च्या दशकातील ब्लॉकबस्टर ठरलेल्या ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ या चित्रपटाच्या रिलीजला आज 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून त्याने अनेक विक्रम केले आहेत. 20 ऑक्टोबर 1995 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आता आणखी एक इतिहास घडवला आहे. चित्रपटाला 25 वर्षे पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने पुढील वर्षी म्हणजेच 2021मध्ये लंडनच्या (London) लीसेस्टर चौकात (Leicester Square) या चित्रपटात मुख्य अभिनेत्याची भूमिका साकारणारा शाहरुख खान आणि अभिनेत्री काजोल यांच्या कांस्य पुतळ्याचे अनावरण केले जाणार आहे. ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ ही एक प्रेमकथा या चित्रपटात दाखवण्यात आली होती. यात शाहरुख खान आणि काजोल यांनी राज आणि सिमरन यांच्या भूमिका साकारल्या होत्या. लंडनमध्ये बॉलिवूड चित्रपटातील पात्रांचा पुतळा उभारण्याची ही पहिलीच वेळ आहे.

हार्ट ऑफ लंडन बिझिनेस अलायन्स’ने सोमवारी याची घोषणा करताना सांगितलं की, ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ मधील कलाकारांच्या मूर्ती लंडनच्या मध्यभागी असलेल्या लेस्टर चौकामध्ये असणाऱ्या देखाव्याचा भाग असणार आहेत.

या चित्रपटाच्या एका सीनमध्ये राज आणि सिमरन एकमेकांना क्रॉस करतात. तेव्हा ते एकमेकांना ओळखतही नसतात. या दृश्याचे चित्रीकरण लीसेस्टर स्क्वेअर येथे करण्यात आले. याशिवाय इतरही अनेक दृश्ये या ठिकाणी शूट करण्यात आली आहेत. त्यामुळे लंडनच्या लिसेस्टर स्क्वेअरमध्ये सीन इन द स्क्वेअर म्हणून हा पुतळा स्थापित केला जाणार आहे.

मराठा मंदिरात आजही सुरु आहे चित्रपट
मुंबई सेंट्रलस्थित मराठा मंदिरात अनेक चित्रपट प्रदर्शित होत असतात. मात्र रोज सकाळी 11.30 वाजता डीडीएलजेचे स्क्रिनिंग होते. मागील 25 वर्षांपासून हा क्रम सुरु आहे. हा चित्रपट छोट्या पडद्यावरही दाखवला जातो. मात्र आजही लोक राज आणि सिमरन यांची लव्ह स्टोरी बघायला आवर्जुन थिएटरमध्ये जातात. मराठा मंदिरचे व्यवस्थापकीय संचालक देसाई यांच्या म्हणण्यानुसार, डीडीएलजेच्या शोवेळी अर्धे थिएटर भरले असते, तर विकेण्डला शो हाऊसफूल असतो.

बजेटच्या 25 पट केली होती कमाई
20 ऑक्टोबर 1995 रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाद्वारे आदित्य चोप्रा यांनी दिग्दर्शनात पदार्पण केले होते. यशराज फिल्म्सच्या अधिकृत वेबसाईटनुसार, चित्रपटाची निर्मिती 4 कोटी रुपयांत करण्यात आली होती आणि त्यावेळी भारतात या चित्रपटाने 89 कोटी आणि परदेशात 13.50 कोटी रुपये कमावले होते. 1995 मध्ये चित्रपटाचे एकूण कलेक्शन 102.50 कोटी झाले होते. आजच्या तारखेनुसार हे कलेक्शन तब्बल 524 कोटी इतके आहे.