एकनाथ खडसेनी दिली भाजपाला सोडचिठ्ठी; शुक्रवारी करणार राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

0
276

भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांनी अखेर भाजपला रामराम ठोकला आहे. खडसे यांनी आज थेट पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. गेल्या ३ ते साडेतीन दशकं भाजपचं नेतृत्व करणारे आणि भाजपची वाढ करण्यासाठी मुंडेंसोबत अनेक वर्ष काम करणारे एकनाथ खडसे यांनी भाजप सोडली आहे. त्यामुळे शुक्रवारी दुपारी २ वाजता खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं त्यामुळे बळ वाढणार आहे.

राजीनामा दिल्यानंतर खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच आपण भाजप नेतृत्वावर नाराज नसून देवेंद्र फडणवीसांमुळं राजीनामा देत असल्याचं खडसेंनी सांगितलं. आपलं जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न फडणवीसांनी केला असल्याचं खडसे म्हणाले. एकनाथ खडसे यांनी भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. येत्या शुक्रवारी ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि खडसे या समीकरणात मीठाचा खडा पडला होता. किंबहुना खुद्द खडसे यांनी कित्येकदा आपली नाराजी बोलूनही दाखवली होती. इतकंच नव्हे, तर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत नाराजीचा सुर आळवल्याचंही पाहायला मिळालं होतं. अखेर पक्षात प्रदीर्घ काळापासून नाराज असणाऱ्या खडसेंनी पक्षत्याग केला. जवळपास ४० वर्षांहून अधिक काळ भाजपमध्ये सक्रीय असलेले एकनाथ खडसे गेल्या काही काळापासून पक्षावर नाराज होते. पक्ष नेतृत्वाकडून आपल्याला डावललं जात असल्याची खंत त्यांनी अनेकदा बोलून दाखवली होती.

मला भाजपमध्ये थांबवण्यासाठी किंवा चर्चेसाठी चंद्रकांत पाटील यांच्याशिवाय कुणीही फोन केला नाही, असंही ते म्हणाले. मी लाचार नाही, कुणाचे पाय चाटणारा देखील नाही, असंही खडसे म्हणाले. रक्षाताईं खडसे भाजप सोडणार नाहीत, त्यांचा निर्णय त्यांनी घ्यावा. आपल्याकडे अशी अनेक उदाहरणं आहेत, असंही ते म्हणाले. रोहिणी खडसे देखील जिल्हा बॅंकेवर राहतील, असंही ते म्हणाले. मी कुठल्याही आश्वासनावर राष्ट्रवादीत जात नाहीये, असंही ते म्हणाले. मी पदासाठी जात नाहीये, पद मी इथंही मिळवलं असतं, असंही ते म्हणाले.

खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर शिक्कामोर्तब :- जयंत पवार

भाजपचे नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करत असल्याचं राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. एकनाथ खडसेंच्या येण्याचे राष्ट्रवादीचे बळ वाढेल. भाजपमध्ये होणारा अन्याय अनेक लोकांनी पाहिला आहे. हळूहळू आपल्याला अनेक गोष्टींचा उलगडा होईल. खडसेंबरोबर येण्याची अनेकांची इच्छा आहे. आम्ही त्यांना टप्पाटप्प्याने प्रवेश देणार आहोत. असं देखील जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

खडसेंना काय द्यायचे याची चर्चा झालेली नाही, शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ते पक्षात येत असल्याचं देखील जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.