बिग बॉस 14 या वादग्रस्त रिऍलिटी शोमध्ये गायक कुमार सानू यांचा मुलगा जान कुमार सानूने मराठी भाषेबद्दल अपमानकारक वक्तव्य केल्याने संताप व्यक्त केला जात आहे. मराठी भाषेची चीड येते, अशा संदर्भातले वक्तव्य जान कुमारने या शोमध्ये केले आहे. हा वाद चिघळण्यापूर्वीच कलर्स वाहिनीनं या प्रकरणात दिलगिरी व्यक्त करण्यात आली. कलर्स वाहिनीने चूक मान्य करत माफी मागितली आहे.
कलर्स वाहिनीनं मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्रात, ‘बिग बॉसचा २७ ऑक्टोबरचा प्रसारित झालेल्या भागातून जान सानूनं केलेल्या वक्तव्यांचा तो भाग हटवण्यात येत आहे. आम्ही मराठी भाषिक व भारतातील सर्व भाषिक प्रेक्षकांच्या भावनांचा आदर करतो,’ असं स्पष्टीकरण वाहिनीकडून देण्यात आलं आहे.
कलर्स वाहिनीने माफीनाम्यात काय म्हटले?
या प्रकरणी माफी मागताना, कलर्स टीव्हीने पत्रात म्हटले की, ‘कलर्स वाहिनीवर 27 ऑक्टोबरला प्रसारित करण्यात आलेल्या एपिसोडमध्ये मराठी भाषेसंदर्भात आम्हाला अनेक तक्रारी मिळाल्या. आम्ही या आक्षेपांची नोंद केली आहे आणि आम्ही ते ज्या ठिकाणी बोलले गेले आहे तो भाग प्रसारित होणाऱ्या सर्व एपिसोड्समधून काढतो आहोत. मराठी भाषेसंदर्भातील वक्तव्याने महाराष्ट्रातील जनतेची मनं दुखवली गेली, याबाबत आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. आमच्यासाठी आमचे प्रेक्षक अमूल्य आहेत. शिवाय सगळ्या भाषा सन्मानीय आहेत’, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
#BiggBoss #BiggBoss14 #BB14 pic.twitter.com/A8o34pz9p6
— COLORS (@ColorsTV) October 28, 2020
जान सानूचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर सर्वच स्तरातून प्रचंड संताप व्यक्त केला गेला. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर, मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांच्यासह शिवसेना प्रवक्ते आमदार प्रताप सरनाईक यांनी त्याचा चांगलाच समाचार घेतला.