बर्थडे स्पेशल: बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानचा आज वाढदिवस

0
541

बॉलिवूडचा बादशहा, सुपरस्टार आणि किंग खान असा अनेक नावाने प्रसिद्ध असलेल्या शाहरुख खानसाठी आज खास दिवस आहे. आज त्याचा 55 वा वाढदिवस आहे. शाहरुखचा जन्म 2 नोव्हेंबर 1965 रोजी नवी दिल्ली येथे झाला होता. शाहरुखचे वडिल ताज मोहम्मद खान एक स्वातंत्र्य सैनिक होते. शाहरुख खानचा मोठा चाहता वर्ग आहे. आजही त्याचे चाहते त्याच्या नव्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असतात. शाहरुखने आतापर्यंत १०० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे.

शाहरुख खान आपल्या आयुष्यातील सुरुवातीची पाच वर्ष आपल्या आजोळी मंगळूरू येथे होता. त्यानंतर तो आपल्या आई-वडिलांसोबत दिल्लीतील राजिन्दर नगरमध्ये राहण्यासाठी गेला. दिल्लीतील सेंट कोलंबज स्कूलमध्ये शाहरुखने आपलं शिक्षण घेतलं. शाहरुख केवळ अभ्यासातच नव्हे तर हॉकी, फुटबॉल आणि क्रिकेटमध्येही अव्वल होता. शाहरुखला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. लहापणी तो रामलीलेत सुग्रीवच्या सेनेत असणाऱ्या एका माकडाची भूमिका साकारत असे. आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर शाहरुखने प्रसिद्ध नाटक दिग्दर्शक बॅरी जॉन यांच्याकडून दिल्लीतील थिएटर अॅक्शन ग्रुपमध्ये अभिनयाचे धडे गिरवले.

शाहरुख खानने १९८८ मध्ये ‘दिल दरिया’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. पण या सिनेमाच्या निर्मितीला उशीर झाल्यामुळे त्याने मालिकेची ऑफर स्वीकारली. १९८९ मध्ये शाहरुख ‘फौजी’ मालिकेत दिसला. या मालिकेत त्याने अभिमन्यू राय ही व्यक्तीरेखा साकारली होती. या मालिकेनंतर त्याने सिनेमांमध्ये काम करायला सुरुवात केली आणि त्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिलं नाही.

शाहरुख खान बद्दल काही माहित नसलेल्या रंजक गोष्टी

  • शाहरुखची आयुष्यातील पहिली कमाईसुद्धा सिनेमासृष्टी क्षेत्रातीलच होती.पंकज उधासच्या एका कार्यक्रमात शाहरुखने स्वयंसेवक(कार्यकर्ता) म्हणून काम केलं. काम पूर्ण झाल्यावर त्याला या कामासाठी पन्नास रुपये मानधन मिळालं होतं. हीच त्याची आयुष्यातील पहिली-वहिली कमाई होती. या पैशांतून शाहरुख ट्रेननं आग्र्याला गेला.
  • अनेक व्यवसायात अयशस्वी झालेले त्याचे वडील दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाची 1974 पर्यंत खानावळ चालवायचे आणि शाहरुख त्यांना सोबत करायचा. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाशी शाहरुखचं जवळचं नातं होतं. तिथूनच त्याला अभियानाचं बाळकडू मिळालं.
  • शाहरुख आणि गौरीची भेट एका डान्स पार्टीत झाली होती. तेव्हा गौरी शाळेत शिकत होती. तिचे वडीलही सदर भागात लष्करात अधिकारी होते. एकात्या पार्टीतील भेटीनंतर पुढे हे नातं अधिक जवळचं झालं. गौरीसाठी शाहरुखने एक संपूर्ण रात्र रेल्वे स्टेशनवर काढली होती. 25 ऑक्टोबर 1991 ला शाहरुख-गौरी लग्नाच्या बेडीत अडकले.
  • शाहरुखने काम खूप केले पण त्याला पहिला ब्रेक मिळाला तो मराठी अभिनेत्रीबरोबर. तो रेणुका शहाणेबरोबर 1989-90 मध्ये आलेल्या ‘सर्कस’ या मालिकेत.
  • ही मालिका शाहरुखच्या आईला दवाखान्यात दाखवली गेली. मात्र त्या इतक्या आजारी होत्या की त्यांनी शाहरुखला ओळखले सुद्धा नाही. एप्रिल 1991 मध्ये त्यांचं निधन झालं. आईच्या निधनानंतर ते दुःख विसरण्यासाठी शाहरुख मुंबईत आला आणि आजवर त्याने रचलेला इतिहास आपण पाहतच आहोत.
  • 1991 सालीच शाहरुखला हेमा मालिनींबरोबर ‘दिल आशना है’ हा त्याचा पहिला चित्रपट मिळाला. पण 25 जून 1992 रोजी ‘दिवाना’ रिलीज झाला आणि नायकाच्या भूमिकेत तो पहिल्यांदा प्रेक्षकांसमोर आला.
  • राहुल या नावाने आजवर शाहरुखने तब्बल ९ चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ‘राहुल, नाम तो सुना होगा’ हे वाक्य फक्त शाहरुखसाठीच बनलं आहे, असं चेष्टेत म्हटलं जातं. ‘डर’, ‘दिल तो पागल है’, ‘कुछ कुछ होता है’, ‘जमाना दिवाना’, ‘यस बॉस’, ‘कभी खुशी कभी गम’ आणि ‘चेन्नई एक्सप्रेस’ अशा किमान 9 चित्रपटांत शाहरुख राहुल बनून प्रेक्षकांसमोर आला आहे.
  • राहुल नंतर राज या नावानेही शाहरुख अनेक चित्रपटातून आपल्या समोर आला. ‘राजू बन गया जेंटलमॅन’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’, ‘मोहब्बतें’, ‘रब ने बना दी जोडी’
  • तुम्हाला जाणून खरोखर आश्चर्य वाटेल की, ‘अपुन बोला, तू मेरी लैला’ हे गाणं स्वतः शाहरुखनं गायलं आहे. हे गाणं ‘जोश’ चित्रपटातील आहे. या गाण्याला प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती.
  • 2008 साली ‘न्यूजवीक’ मॅगझिननं जगातल्या सर्वाधिक प्रभावशाली 50 लोकांच्या यादीत शाहरुखला 41वं स्थान दिलं. बराक ओबामा यात सगळ्यांत वरच्या स्थानावर होते.
  • फोर्ब्स मासिकाच्या सर्वाधिक पैसे कमवणाऱ्या जगातल्या टॉप 10 अभिनेत्यांच्या यादीत शाहरुख 8 व्या क्रमांकावर आहे.
  • शाहरुख खानचे चित्रपट आपल्या रोमँटिक स्टाइलसाठी ओळखली जात असली तरी खलनायक म्हणूनही त्याने बाजीगर, डर, अंजाम, डॉन यासारख्या सिनेमांमधून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
  • आज पन्नाशीतही शाहरुखला खेळण्यांचं वेड आहे. त्याला हॉकी आणि फूटबॉलची आवड आहे. ‘चक दे इंडिया’मधून तो भारतीय महिला हॉकी संघाचा कोच होता तर ‘कभी अलविदा ना कहना’ मध्ये तो फूटबॉल खेळताना दिसत आहे. शिवाय IPLच्या कोलकाता नाईट राइडर्स टीमचा ‘किंग खान’ मालक आहे.
  • इंग्लंडमधल्या ‘नाईटहूड’च्या बरोबरीचा एक मलेशियन सन्मान मिळवणारा शाहरुख हा पहिला भारतीय सिनेकलाकार आहे. 2005 साली भारत सरकारचा ‘पद्मश्री’ आणि 2014 साली फ्रान्सचा सर्वोच्च सन्मान ‘लिजन ऑफ ऑनर’ शाहरुखला मिळाला. एडिनबऱ्हा विद्यापीठानंही त्याला मानद डॉक्टरेटची पदवी देऊन सन्मानित केलं.