शेन वॉटसनची आयपीएलमधून निवृत्ती; शेन वॉटसनचा सर्व प्रकारच्या क्रिकेटला रामराम

0
180

ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू आणि आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्जचं प्रतिनिधीत्व करणारा शेन वॉटसनने अखेरीस सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. ३९ वर्षीय वॉटसनने किंग्ज इलेव्हन पंजाब विरूद्धच्या सामन्यानंतर चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) च्या व्यवस्थापनाला आपल्या निवृत्तीबद्दल सांगितलं. “साखळी फेरीचा शेवटचा सामना खेळून झाल्यावर CSKच्या ड्रेसिंग रूममध्ये IPLमधून निवृत्त होत असल्याची घोषणा करताना वॉटसन खूपच भावूक झाला होता. चेन्नईसाठी खेळायला मिळणं हे खूप भाग्याचं होतं असं तो म्हणाला”.

ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज शेन वॉटसन याने २०१६ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हटलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केलेला शेन वॉटसन गेली काही वर्ष लिग क्रिकेटमध्ये सहभागी होत होता. चेन्नईच्या संघाने जेव्हा २०१८ साली वॉटसनला संघात विकत घेतलं, तेव्हा तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला होता. २०१८च्या हंगामात चेन्नईने विजेतेपद पटकावलं होतं. त्या विजयात वॉटसनचा सिंहाचा वाटा होता. २०१९च्या अंतिम सामन्यातही वॉटसनने एकट्याने झुंज दिली होती.

कारकिर्दीत प्रत्येक पावलावर सहकार्य करणाऱ्या आई-बाबा, बहिणी, पत्नी यांचे वॉटसनने आभार मानले आहेत. आई-वडिलांनी आपल्यासाठी केलेला त्याग कधीच विसरु शकणार नसल्याचं वॉटसनने सांगितलं. लॉकडाउनचा काळ, दुखापती यासारख्या अनेक अडचणींना सामोरं जात वॉटसन आयपीएलच्या तेराव्या हंगामात सहभागी झाला होता. मात्र ३९ वर्षीय वॉटसनला यंदाच्या हंगामात आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. तेराव्या हंगामात वॉटसनने चेन्नईकडून ११ सामन्यांमध्ये १२१.०५ च्या सरासरीने २९९ धावा केल्या. मात्र महत्वाच्या सामन्यांत आपल्या संघाचं आव्हान कायम राखण्यात तो अपयशी ठरला.

२०१६ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर ४ वर्ष वॉटसन टी-२० क्रिकेट खेळत होता. ऑस्ट्रेलियाकडून ५९ कसोटी, १९० वन-डे आणि ५८ टी-२० सामने वॉटसनने खेळले आहेत.

वॉटसनची आयपीएल कारकिर्द
शेन वॉटसनने आयपीएलमध्ये एकूण 145 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 137.91 च्या स्ट्राईक रेटने आणि 30. 99 च्या सरासरीने 2 हजार 809 धावा केल्या आहेत. यामध्ये 4 शतक आणि 21 अर्धशतकांचा समावेश आहे. नाबाद 117 ही त्याची आयपीएलमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. तसेच बोलिंग करताना वॉटसनने 145 सामन्यात 92 विकेट्स घेतल्या आहेत. 29 धावा देऊन 4 विकेट्स ही त्याची सर्वोत्त कामगिरी आहे.