- हिटमॅन रोहित शर्माची कर्णधारपदी साजेशी खेळी
- मुंबई इंडियन्सचे आयपीएलचे पाचवे विजेतेपद
हिटमॅन रोहित शर्माच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर आणि इशान किशनच्या नाबाद 33 धावांच्या शानदार खेळीच्या साहाय्याने मुंबई इंडियन्सने अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सवर 5 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. या विजयासह मुंबईने पाचव्यांदा आयपीएलंच विजेतेपद पटकावलं आहे. मुंबईकडून कर्णधार रोहित शर्माने अर्धशतकीय खेळी केली. तर रोहितसाठी एखाद्या संघाचे प्रतिनिधीत्व करताना हे सहावे IPL विजेतेपद ठरले. २००९ला डेक्कन चार्जर्सच्या IPL विजेत्या संघातही रोहितचा समावेश होता.
त्याआधी दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली. मुंबईचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट सुरुवातीच्या षटकांत अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत विकेट मिळवण्यासाठी ओळखला जातो. त्याने दिल्लीचा सलामीवीर मार्कस स्टोईनिसला पहिल्याच षटकात खातेही न उघडता माघारी पाठवले आणि अजिंक्य रहाणेला केवळ २ धावांवर बाद केले. तसेच फॉर्मात असलेल्या शिखर धवनला (१५) जयंत यादवने माघारी पाठवल्याने दिल्लीची ३ बाद २२ अशी अवस्था झाली. यानंतर मात्र कर्णधार अय्यर आणि रिषभ पंत यांनी चौथ्या विकेटसाठी ९६ धावांची भागीदारी रचत दिल्लीचा डाव सावरला. पंतने यंदाच्या मोसमातील पहिले अर्धशतक झळकावताना ३८ चेंडूत ५६ धावांची खेळी केली. नेथन कुल्टर-नाईलने त्याला बाद करत ही जोडी फोडली. अय्यरने मात्र त्यानंतरही आपली चांगली फलंदाजी सुरु ठेवली. त्याने अखेरच्या षटकांत फटकेबाजी केल्याने दिल्लीने २० षटकांत ७ बाद १५६ अशी धावसंख्या उभारली. मुंबईकडून ट्रेंट बोल्टने शानदार गोलंदाजी करत चार षटकांत 30 धावा देऊन तीन बळी घेतले. तर नॅथन कुल्टर नाईलला दोन आणि जयंत यादवने एक विकेट घेतली.
दिल्लीने मुंबईला विजयासाठी 157 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान मुंबईने 5 विकेट्स गमावून 18.4 ओव्हरमध्येच पूर्ण केलं. मुंबईकडून रोहित शर्माने सर्वाधिक 68 धावांची खेळी केली. इशान किशनने नाबाद 33 धावा केल्या. दिल्लीकडून एनरिच नोर्तजेने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर कगिसो रबाडा आणि मार्कस स्टोयनिसने प्रत्येकी 1 विकेट घेतला.
रोहित शर्माने अखेरच्या सामन्यात कर्णधार पदाला साजेशी खेळी करत दिल्ली कॅपिटल्सचा धुरळा उडवला. पहिल्या चेंडूपासून मुंबईने दिल्लीवर वर्चस्व गाजवले. ज्यामुळे दिल्लीचा पाच विकेट्स राखून धुव्वादार पराभव करता आला.