हिंदुहृदयसम्राट’ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिन

0
362

महाराष्ट्राच्या राजकारणात अनन्यसाधारण स्थान असणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज (१७ नोव्हेंबर) आठवा स्मृतिदिन. बाळासाहेब आज आपल्यात नसले तरीही त्यांची वादळी राजकीय कारकिर्द आणि राजकारणातील त्यांचं योगदान हे कायमच अग्रस्थानी राहील. अशा या नेत्याच्या काही स्मृतींना शिवसेनेचं मुखपत्र असणाऱ्या ‘सामना’तून उजाळा देण्यात आला आहे.

‘बाळासाहेबांना साष्टांग, साष्टांग नमस्कार’, असं म्हणत ‘शूरातला शूर, सुंदरातला सुंदर, अदभूत प्रेमकथेच्या नायकासारखा बाजीराव मनाला चटका लावून गेला’, हा संदर्भ देत बाळासाहेबांचं वर्णन करण्यात आलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठा प्रभाव असणाऱ्या बाळासाहेबांच्या कारकिर्दीतील काही महत्त्वाच्या टप्प्यांवर प्रकाझोत टाकण्यात आला.

आज महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान झालेला असताना बाळासाहेब देहाने आपल्यात नाहीत, पण मंत्रालयावर भगवा फडकणे हे त्यांचेच यश आहे. बाळासाहेबांमुळे महाराष्ट्र, मराठी माणूस, हिंदुत्व सतत विजयी होत राहिले. संकटाच्या छाताडावर पाय रोवून ते लढत राहिले! बाळासाहेब हे मनुष्यच होते, पण ते अमर आहेत. ते दैवीपुरुष होते, पण देवानांही त्यांच्या लोकप्रियतेचा, त्यांच्यावरील श्रद्धेचा हेवाच वाटत असावा. बाळासाहेब हे वीरपुरुष होते. त्या वीरास अखेरची मानवंदना देण्यासाठी 17 नोव्हेंबर, 2012 रोजी शिवतीर्थावर 40 लाख मर्दांचा सागर जमला. हे भाग्य कुणाला लाभले काय? बाळासाहेबांच्या स्मृतीस आमचे लाखो लाखो साष्टांग नमस्कार!

बाळासाहेब ठाकरे बद्दल काही आठवणी:

तेजस्वी नेतृत्व आणि तमाम मराठी जनतेच्या मनात आदरणीय स्थान प्राप्त करणारे ‘हिंदुहृदयसम्राट’ शिवसेनाप्रमुख बाळ केशव ऊर्फ बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रात सत्ता असताना आणि सत्तेबाहेर असतानाही राज्याच्या राजकारणावर आपला रिमोट कंट्रोल कायम ठेवला. सत्ताधीशांच्या प्रत्येक कृतीवर आणि उक्तीवर व्यंगोक्तीपूर्ण टिप्पणी करून सत्ताधीशांचीही भंबेरी उडविण्याची शक्ती ‘व्यंगचित्रकार बाळ ठाकरे’ यांच्या कुंचल्यात होती, तीच शक्ती ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे’ यांच्या लेखणीत आणि प्रखर वक्तृत्वातही होती. मराठी माणसाच्या मनात आपल्या मराठीपणाचा अभिमान रुजविण्याचा वसा त्यांनी शिवसेनेच्या स्थापनेपासून गेली तब्बल ४६ वर्षे अविरतपणे चालविला आणि पार पाडला..

बाळासाहेबांच्या लेखनालादेखील त्यांच्या प्रखर भाषणांइतकीच प्रभावी धार होती, म्हणूनच महाराष्ट्रात त्यांच्या लेखन आणि भाषणांना ठाकरी शैली अशी अनोखी ओळख मिळाली. महाराष्ट्रात मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणाऱ्या शिवसेनेचा राज्यातील प्रभाव वाढत असतानाच राजकारणातही ही संघटना पाय रोवत होती. मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा भगवा पहिल्यांदा फडकल्यानंतर राजकारणातील शिवसेनेचा ठसा अधिकच ठळक झाला, आणि महाराष्ट्रात मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी लढण्याकरिता स्थापन झालेली ही संघटना राजकीय पक्षाच्या रूपात उदयास येऊ लागली. राष्ट्रीय राजकारणातही शिवसेनेचे नाव अधोरेखित होऊ लागले. याच काळात शिवसेनेच्या अभेद्य तटबंदीला छगन भुजबळ, गणेश नाईक आदी नेत्यांनी पक्षांतराचे खिंडार पाडले. शिवसेनेची मुलुखमैदान तोफ म्हणून राज्याच्या विधानसभेत सरकारविरुद्ध लढणारे भुजबळ पक्षाबाहेर पडल्यानंतर संघटना दुबळी होईल, ही अटकळ बाळासाहेबांनी फोल ठरविली आणि पक्षाला नवी ताकद देण्यासाठी अविश्रांत परिश्रम सुरू झाले. झंझावाती दौरे, सभा घेत आणि माणसे जोडत बाळासाहेबांनी शिवसेनेला नवी संजीवनी देण्याचा जणू ध्यास घेतला, आणि राजकीय समीकरणांचाही आढावा घेण्यास सुरुवात केली.

शिवसेना महाराष्ट्रात स्थिरस्थावर झाल्यानंतर पक्षाचा मुख्य उद्देश महाराष्ट्रात गैर मराठी लोकांच्या तुलनेत मराठी लोकांकरीता जास्त रोजगार निर्माण करणे हा होता. म्हणुन १९८९ साली शिवसेनेने सामना या वृत्तपत्राची निर्मीती केली. राजनैतिक दृष्टया पाहता शिवसेना कुण्या एका समुदायाचा पक्ष नव्हता. त्यांनी मुंबईत भाजपा (भारतीय जनता पक्ष) सोबत युती केली.

१९९५ साली महाराष्ट्रातील निवडणुकांमध्ये भाजप आणि शिवसेनेचा मोठया मताधिक्याने विजय झाला. आणि १९९५ ते १९९९ दरम्यान बाळासाहेब ठाकरेंनी स्वतःला ’’रिमोट कण्ट्रोल’’ मुख्यमंत्री घोषीत केले. धर्माच्या नावावर मतं मागण्याचा आरोप ठेवत २८ जुलै १९९९ ला निवडणुक आयोगाने बाळासाहेबांच्या मतदानाच्या अधिकारावर ६ वर्षांपर्यंत प्रतिबंध लावला व ११ डिसेंबर १९९९ ते १० डिसेंबर २००५ या ६ वर्षांदरम्यान कोणत्याही निवडणुकीत सहभागी होण्यावर देखील निर्बंध लावले.

निर्बंध हटवल्यानंतर पहिल्यांदा बाळासाहेबांनी मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुकीत मतदान केले होते. शिवसेना कायम मुंबईतील मराठी माणसाच्या पाठीशी उभी राहील अशी बाळासाहेब ठाकरेंची कायम घोषणा होती. ते म्हणायचे जे लोक आमच्या धर्माच्या विरोधात आहेत त्यांना भारतातुन हाकलुन द्यायला हवे. विशेषतः जेव्हां कुणी हिंदु धर्माच्या विरोधात वक्तव्य करतं तेव्हां त्याला चांगलेच प्रत्युत्तर द्यायला हवे.

ज्या काळात महाराष्ट्रात मोठया प्रमाणात बेराजगारी निर्माण झाली होती त्याच वेळी बाळासाहेबांनी महाराष्ट्राचा विकास करण्याकरीता धुरा हाती घेतली आणि महाराष्ट्रातील जनतेकरीता अनेक रोजगार उपलब्ध करून दिले.

राजकारणात असे तळपते आणि रोखठोक आक्रमक विचार मांडणारे बाळासाहेब व्यक्तिगत आयुष्यात मात्र, खूप प्रेमळ आणि कुटुंबवत्सल होते, हे त्यांच्या जीवनपटावरून सहज जाणवते. पत्नी मीनाताई यांचे निधन, मुलगा बिंदुमाधव यांचा मृत्यू, शिवसेनेतील राजकीय बंडामुळे दूर होणारे निकटवर्तीय अशा अनेक प्रसंगांत त्यांचे हळवेपणही महाराष्ट्राने अनुभवले. छगन भुजबळ, नारायण राणे, गणेश नाईक अशी अनेक माणसे राजकीयदृष्टय़ा दुरावली, पण बाळासाहेबांच्या मोठेपणाच्या आठवणी या नेत्यांच्या मनाच्या हळव्या कप्प्यात आजही जिवंत आहेत, त्याचे हेच कारण! मीनाताईंच्या निधनानंतर अनेकदा त्यांच्याशी बोलताना, किंवा त्यांना जनतेसोबत साधलेल्या संवादातून, मानसिकदृष्टय़ा हळवे झालेले बाळासाहेब महाराष्ट्राने अनुभवले. पुतण्या राज ठाकरे यांनी शिवसेना सोडून स्वत:चा पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांनी आपली वेदना लपविली, पण राज ठाकरे यांच्या विभक्तपणाचे दु:ख अनेकदा त्यांच्या वागण्यातून व्यक्त झालेलेही महाराष्ट्राने पाहिले. शिवसैनिक हा माझा प्राण आहे, ही माझी संपत्ती आहे आणि ऊर्जा आहे असे सांगत सामान्य शिवसैनिकाच्या हृदयात घर करणाऱ्या या असामान्य नेत्याने आपल्या अखेरच्या भाषणातही, त्याचाच पुनरुच्चार केला होता. माझे हृदय तुमच्यापाशी आहे, असे सांगत बाळासाहेबांनी असंख्य शिवसैनिकांची हृदये काबीज केली.. त्यामुळे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे मराठी माणसाच्या हृदयातील स्थान यापुढेही अढळ राहणार आहे