नाटकांना होणार सुरुवात ;पुनश्च हरिओम म्हणत प्रशांत दामलेंनी दिली आनंदाची बातमी

0
531

महाराष्ट्रामध्ये कोरोना संकटाशी सामना करता करता पुनश्च हरिओम म्हणत पुन्हा अनेकांनी कामाला सुरूवात केली आहे. महाराष्ट्र राज्य सरकारनेही मिशन बिगिन अगेन अंतर्गत राज्यात सिनेमागृह, नाट्यगृह उघडण्यास सशर्त मंजुरी दिली आहे. प्रशांत दामले यांच्या ‘‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाचा १२ डिसेंबर आणि १३ डिसेंबर रोजी पुण्यात पुनश्च हरिओम होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. फेसबुक पोस्टद्वारे प्रशांत दामले यांनी याबाबत माहिती दिली.

दरम्यान, प्रशांत दामले यांच्या पोस्टनंतर अनेक नाट्यरसिकांनी पुन्हा प्रयोग सुरू करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. “आम्ही अनेक दिवसांपासून याची वाट पाहत होतो. तुमच्या या निर्णयामुळे बॅक स्टेज कलाकारांनाही दिलासा मिळेल आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा,” अशी कमेंट एका रसिक प्रेक्षानं केली आहे.

‘एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकामध्ये अभिनेते प्रशांत दामले आणि कविता लाड ही जोडगोळी मुख्य भूमिकेत आहे. एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकाची प्रस्तुती झी मराठीची आहे. तर अद्वैत दादरकर या नाटकाचं दिग्दर्शन करणार आहे. ईम्तीयाझ पटेल हे या नाटकाचे मूळ लेखक आहेत.

मागील काही दिवसांपूर्वी त्यांनी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ आणि प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी यांची भेट घेतली होती. बालगंधर्व रंगमंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, साठे सभागृह या तिन्ही नाट्यगृहांची स्वच्छता मोहीम जोरात सुरू असल्याची माहिती दिली होती. त्याचे काही व्हिडिओ देखील शेअर केले होते. त्यामुळे आता पुण्यात पुन्हा नाट्यप्रयोग लवकरच सुरू होतील अशी रसिकांची आशा होतीच. अखेर ही गोष्ट सत्यामध्ये उतरली आहे.

प्रशांत दामलेंच्या कामाचं राज्यपालांनी केलं होतं कौतुक

करोना काळात आर्थिक संकटात सापडलेल्या पडद्यामागील कलाकारांना मदतीचा हात देणारे प्रशांत दामले यांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवनात सत्कार करण्यात आला होता. निर्माते सुभाष घई, नगरसेविका अलका केरकर यांच्यासह विविध क्षेत्रात करोना काळात असामान्य कार्य करणाऱ्या करोना योद्धांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता.