सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या

0
629

नैराश्याच्या भरात वरोरा येथील महारोगी सेवा समितीच्या सीईओ, ज्येष्ठ समाजसेवक स्व. बाबा आमटे यांची नात आणि डॉ. विकास आमटे यांच्या कन्या डॉक्टर शीतल आमटे – करजगी यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. शीतल आमटे सध्या आनंदवनची संपूर्ण जबाबदारी सांभाळत होत्या. बाबा आमटे यांच्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व त्या करीत होत्या. मागील काही महिन्यांपासून आमटे परिवारात अंतर्गत संघर्ष पेटला होता.

प्राथमिक अंदाज वर्तवल्यानुसार शीतल आमटे या मागील काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली होत्या. ज्यामुळं त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान, सोमवारी त्यांच्या आत्महत्येचं वृत्त समोर येण्यापूर्वी, सोमवारी सकाळी 5 वाजून 45 मिनिटांच्या सुमारास शीतल आमटे यांनी एक ट्विट केलं होतं. या ट्विटमध्ये त्यांनी ऍक्रेलिक कॅनव्हास पेंटींगचा फोटो शेअर केला. या फोटोवर चित्राच्या खाली त्यांचं नाव आणि रविवारची म्हणजेच 29 नोव्हेंबरची तारीखही दिसत आहे.

शीतल आमटे यांनी विषाचे इंजेक्शन घेतल्याची माहिती समोर येत असून, हे विष घेतल्यावर त्यांना तातडीने वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं होतं, पण तिथे उपस्थित वैद्यकीय अधिकार्‍यांनी डॉ. शितल ह्यांचा मृत्यु झाल्याचं घोषित केलं. कुष्ठरोग्यांच्या आयुष्यात आनंद पेरणाऱ्या आनंदवनमध्येच ही धक्कादायक घटना घडल्याने सामाजिक वर्तुळ हादरलं आहे.

डॉक्टरीसेवा करत असतानाच सोशल आंत्रप्रनरशिप अभ्यासक्रम पूर्ण करून हेमलकसा, आनंदवन, सोमनाथ येथील संस्थांचं वित्त नियोजन करणं असो की आनंदवनला ‘स्मार्ट व्हिलेज’ बनवणं असो, अपंगांसाठी ‘निजबल’ आणि बेरोजगार युवकांसाठी ‘युवाग्राम’ उपक्रम राबवणे असो, ‘आनंद मूकबधिर विद्यालय’ आणि ‘आनंद अंध विद्यालय’ या शाळांचं डिजिटलाझेशन असो किंवा मियावाकी पद्धतीने चार जंगलं वसण्याचं पर्यावरणीय योगदान असो, आमटे कुटुंबीयांचा समाजसेवेचा वारसा डॉक्टर शीतल आमटे, सशक्तपणे पुढे चालवत होत्या.

ग्रामीण संस्कृतीचे रक्षण आणि रोजगाराच्या संधी मिळून तरुणाईचे शहराकडे पलायन थांबवणं, हा ध्यास घेतलेल्या डॉ. शीतल आमटे-करजगी यांना आनंदवनला ‘स्मार्ट व्हिलेज’ बनवायचं होतं. तांत्रिक, आर्थिक, सामाजिकदृष्टय़ा खेडय़ांनाच सक्षम करणारा हा उपक्रम त्यांनी राबवला. यामध्ये सौर ऊर्जा, ‘हेल्थ एटीएम’, उपक्रमशीलतेला शीतल यांच्या कल्पनेतून साकारलेल्या या स्मार्ट व्हिलेजमध्ये विशेष स्थान होतं.

डॉक्टर म्हणून काम करताना असे काही अनुभव आले की ज्याने शीतल यांचा शिक्षणाप्रतिचा दृष्टिकोन बदलून गेला. मूळगव्हाण या खेडय़ात काम करताना एक खरजेने भरलेले मूल घेऊन एक आदिवासी स्त्री त्यांच्याकडे येत असे. तिला महिनाभर औषधे देऊनही मूल बरे न झाल्याने शीतल त्यांना रागावल्या होत्या. तेव्हा त्या ताईने शीतल यांना, ‘ताई, एका कडेवर सहा महिन्यांच्या बाळाला घेऊन तीन किलोमीटरवरून पाणी आणावे लागते. प्यायलाच पाणी पुरत नाही. त्यामुळे मुलाला रोज आंघोळ घालणे शक्य होत नाही. खरूज आमचा रोग नाही ताई, पाणी नसणे हा आहे.’ डॉक्टर होण्याबरोबरच त्या प्रश्नाच्या पलीकडे बघायची गरज लक्षात आल्यावर शीतल या गावात पाणी व वीज उपलब्ध करून देऊन आरोग्याचे प्रश्न सोडविले.

आमटे कुटुंबात अंतर्गत संघर्ष….. 

डॉ. शीतल आमटे मागील काही काळापासून आनंदवनची संपूर्ण जबाबदारी सांभाळत होत्या. बाबा आमटे यांच्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व त्या करत होत्या. मागील काही महिन्यांपासून आमटे कुटुंबात अंतर्गत संघर्ष पेटला होता. हा वाद अनेकदा समोरही आला. या वादाच्या केंद्रस्थानी डॉ. शीतल असल्याचं म्हणत त्यांच्यावर वेळोवेळी आरोप करण्यात आले होते.