शेतकरी कृषी विधयेक आंदोलनाला बॉलिवूड आणि क्रीडापटू सेलिब्रिटींचाही पाठिंबा

0
571

देशभरातील शेतकरी कृषी कायद्याविरोधात आंदोलन करत असून त्यांच्या मागण्या मान्य करण्यास सांगत आहेत. यावेळी सर्वत्र शेतकरी आंदोलनाचीच चर्चा आहे आणि अनेकजण यावर आपला अभिप्रायही देताना दिसत आहेत.गेल्या आठवडाभरापासून हे शेतकरी थंडीचा सामना करत दिल्लीच्या रस्त्यावर आहेत त्यामुळे त्यांनी ८ तारखेला भारत बंदचं आव्हान केलं आहे. एकीकडे संपूर्ण पंजाब सिनेसृष्टी शेतकरी आंदोलनाला पुढे येऊन पाठिंबा देत आहे. आता बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटी या आंदोलनावर आपली भूमिका मांडताना दिसत आहेत. काही कलाकरांनी तर थेट आंदोलन स्थळी भेटीही दिल्या आहेत.

पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. तर अभिनेत्री कंगना रणौतने या आंदोलनाला विरोध केला आहे. यामुळे दोन्ही कलाकारांमध्ये ट्विटवर वॉरही रंगलं होतं. दिलजीतने नुसता पाठिंबाच दिला नाही तर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना 1 कोटींची मदत केली आहे. तसंच तो आंदोलनस्थळी भेट देऊन आला.

शनिवारी रितेश देशमुखने ट्वीट करत म्हटलं की, ‘जर तुम्ही आज जेवत असाल तर त्याबद्दल शेतकर्‍याचे आभार माना. मी आपल्या देशातील प्रत्येक शेतकऱ्यांसोबत एकजुटने उभा आहे.’ यासह अभिनेत्याने #जयकिसान लिहिले. लोक त्याच्या या निर्णयाचं कौतुक करत आहेत. स्वतः रितेश देशमुख अनेकदा देशातील महत्त्वपूर्ण प्रश्नांवर आपलं मत मांडताना दिसतो.

प्रसिद्ध भारतीय कॅनेडियन गायक जॅजी बी यानेही शेतकऱ्यांच्या समर्थनात ट्वीट केलं आहे. जॅजी बीने आपल्या ट्विटर अकाउंटवर शेतकरी चळवळीचे अनेक व्हिडिओही शेअर केले आहेत.

प्रियांका चोप्राही भारतामधील घडामोडींवर ती लक्ष ठेऊन असते. तिने केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, “आपले शेतकरी हे भारताचे फूड सोल्जर्स आहेत. त्यांची भीती दूर करणं आवश्यक आहे. त्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजेत. लोकशाही देश म्हणून हे संकट लवकरात लवकर दूर होईल याची काळजी घेणं आवश्यक आहे”

शेतकरी हे आई वडिलांपेक्षा कमी नाही’अशा शब्दात सोनू सूदने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.

बॉलिवूड आणि पंजाब सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. सोनू सूद, गुरदास मान, गिप्पी ग्रेवाल, हनी सिंग, कपिल शर्मा, स्वरा भास्कर, वीर दास, तापसी पन्नू यांच्यासह अनेक स्टार सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बाजूने बोलताना दिसत आहेत.

‘कुठलेही प्रश्न सामंजस्याने सोडवता येतात. त्यामुळे या प्रश्नावरही सामंजस्याने तोडगा काढता येईल. याल प्रश्नाला राजकीय वळण देऊ नका’, असे आवाहन कपिल शर्माने केले आहे. ‘आम्ही सगळे देशवासी शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत. तेच आपले अन्नदाते आहेत’, असे म्हणत त्याने या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवला आहे.

प्रसिद्ध क्रिकेटपटू हरभजन सिंग यानेही ट्वीट करून शेतकऱ्यांच्या मागण्यांचं समर्थन केलं आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये स्पष्ट शब्दात म्हटलं की, ‘शेतकरी आपला अन्नदाता आहे. आपण अन्नदात्याला थोडा वेळ दिला पाहिजे. हे वाजवी होणार नाही का? पोलिसांच्या चकमकीशिवाय आपण त्यांचं म्हणणं शांतपणे ऐकू शकत नाही का? कृपया शेतकऱ्यांचंही ऐकून घ्या.. जय हिंद.’