देशव्यापी बंदचा पुण्यात परिणाम; बाजार समितीत फळ-भाज्यांची आवक कमी

0
453

शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील किराणा आणि भुसार मालाची बाजारपेठ आज बंद ठेवण्यात आले आहे. शेतकऱ्यांचा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि भारत बंद सहभाग घेतल्याने पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधे शेतकऱ्यांनी पुकारलेल्या बंदचा परिणाम दिसून येत आहे. फळे आणि भाजीपाला घेऊन येणाऱ्या फक्त १७४ गाड्यांची आज पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक झाली आहे.

नेहमी दररोज किमान ९०० मालवाहतूक गाड्यांमधून या बाजार समितीत फळं आणि भाजीपाल्याची आवक होत असते. त्यामुळे बाजार समितीत आज गर्दी दिसून येत नाहीये. बाजार समितीतील किराणा आणि भुसार मालाची बाजारपेठ शेतकरी बंदच्या समर्थनार्थ बंद ठेवण्याचा निर्णय आधीच घेण्यात आला. हमालही सहभागी झाले असल्याने मार्केट मध्ये शांतता दिसत आहे.

पुण्यात व्यापारी महासंघाने आपला निर्णय बदलला आहे. पुण्यातील सर्व दुकानं दुपारी १२.३०पर्यंत बंद राहणार आहेत. तर आंदोलनाला पाठिंब्यासाठी मोर्चामध्ये सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

आज पुकारण्यात आलेल्या भारत बंदला पुण्यातील व्यापाऱ्यांनी पाठिंबा दर्शवला आहे. मात्र दुकानं सुरूच ठेवण्याचा निर्णय पुणे व्यापारी महासंघाने घेतला होता. आता या निर्णयात बदल केला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांना आमचा पाठिंबा आहे. मात्र कोरोनामुळे आधीच अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे दुकाने बंद न ठेवता, शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्याचा निर्णय पुणे व्यापारी महासंघानं घेतला होता. आता यात बदल करत दुपारपर्यंत दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

पुणे-बंगळुरू महामार्गावर बंदचा परिणाम चांगलाच जाणवला. महामार्गावर वाहतूकीची वर्दळ कमी जाणवली. दूधाचे टँकर आणि अन्य अवजड वाहनांशिवाय वर्दळ कमी जाणवली. भाजीपाला, शेतमाल कोल्हापूरात पोहोचला नाही.

केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे. मात्र, यात काहीही निष्पन्न न झाल्याने आज बंदची हाक पुकारण्यात आली आहे. केंद्र सरकारमध्ये सहावी बैठक ९ डिसेंबरला होणार आहे. शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम राहणार की तोडगा निघणार याबद्दल उद्याच्या बैठकीत ठरेल.