शनिवारपासून राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांना मिळणार मोफत रक्त

0
281

राज्यात शनिवार दि. १२ डिसेंबरपासून सर्व शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांना मोफत रक्त (free blood) मिळणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज केली. रक्त तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे व खासदार सुप्रिया सुळे यांनी आज रक्तदान करून नागरिकांना रक्तदानासाठी आवाहन केले. काही दिवसांपूर्वी माहिती मिळत होती की राज्यात फक्त काही दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा उपलब्ध आहे. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. आता राज्यात शनिवार, 12 डिसेंबर पासून सर्व शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांना मोफत रक्त मिळणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

यावेळी आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, शासकीय रुग्णालयात रक्तावरील प्रकियेसाठी ८०० रुपये शुल्क आकारले जाते. आता शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या रुग्णाला रक्ताची गरज भासल्यास त्यास मोफत रक्त उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

एखाद्याचा जीव वाचविण्यासाठी रक्त हा घटक किती महत्वाचा आहे याची सर्वांना जाणीव आहे.राज्यात सुमारे ३४४ ब्लड बँक कार्यरत आहेत. त्यामध्ये काही दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा उपलब्ध आहे. कोरोनामुळे महाविद्यालये बंद आहेत. खासगी कंपन्यांचे वर्क फ्रॉम होम सुरू आहे आणि सोशल डिस्टंसिंगच्या मर्यादेमुळे रक्तदान शिबीरे आयोजित करण्यावर मर्यादा येत आहेत. यासाऱ्यांमुळे रक्तदान कमी होत आहे. एरवी महाराष्ट्र देशात रक्त संकलानात अग्रेसर आहे. मात्र आता कोरोनामुळे रक्तटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे रक्तदान करणे हाच एक पर्याय असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

रक्त तयार करता येत नाही आणि संकलन केलेले रक्त दीर्घकाळ साठवता येत नाही त्यामुळे सातत्याने रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे आवश्यक आहे. ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त १३ ते २० डिसेंबर दरम्यान स्वाभिमान सप्ताह साजरा केला जाणार असून त्यानिमित्त प्रत्येक तालुक्यात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांनी आपल्या वाढदिवशी, लग्नाच्या वाढदिवशी अशा विविध प्रसंगाचे औचित्य साधून वर्षातून दोन वेळेस रक्तदान करण्याचे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केले.