भारत-बांग्लादेश दरम्यान बंद झालेली रेल्वेसेवा होतेय ५५ वर्षांनी सुरु

0
438

भारत आणि बांगलादेश या दोन सख्या शेजारी देशांसाठी 17 डिसेंबर हा दिवस मोठा महत्वाचा असणार आहे. या दिवशी दोन्ही देशांमधील रेल्वे सेवा तब्बल 55 वर्षांनी सुरु होणार आहे. या रेल्वे मार्गाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना करणार आहेत.

कोणत्या मार्गावर धावणार रेल्वे?

पश्चिम बंगाल (West Bangal) मधील हल्दीबाडी आणि बांगलादेशमधील चिलहटी यांच्या दरम्यान ही रेल्वे सेवा सुरु होणार आहे. विशेष म्हणजे बांगलादेश पूर्व पाकिस्तानचा भाग होता तेंव्हा 1965 सालापर्यंत या मार्गावर रेल्वे सेवा सुरु होती. त्यानंतर भारत आणि पूर्व पाकिस्तानमधील रेल्वे संपर्क तुटला होता. तो संपर्क आता बांगलादेश निर्मितीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या सुरुवातीला पुन्हा एकदा सुरू होणार आहे.

भारत-बांगलादेश या दोन देशांमधून सुरु होणाऱ्या या रेल्वे मार्गामुळे कोलकाता आणि जलपैगूडी या रेल्वेला आता सात तासांचा वेळ लागणार आहे. यापूर्वा या प्रवासाला बारा तास लागत असत. आता या रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या वेळेत पाच तासांची बचत होणार आहे.

ईशान्य भारत सीमा रेल्वे विभाग (NFR) चे जनसंपर्क अधिकारी सुभाष चंद्रा यांनी याबाबत माहिती दिली आहे. चिलहटी ते हल्दीबाडीपर्यंत एक माल गाडी चालवण्यात येणार असून त्याची मालकी NFR च्या कटिहार विभागाची आहे. कटिहार विभागातील रेल्वे अधिकाऱ्यांनी देखील याबाबतची माहिती परराष्ट्र मंत्रालयाला दिली आहे.

हल्दीबाडी रेल्वे स्टेशनपासून आंतरराष्ट्रीय सीमा साडे चार किलोमीटर अंतरावर आहे. तर बांगलादेशमधील चिलहटीपासून आंतरराष्ट्रीय सीमा ही साधारण साडे सात किलोमीटर दूर आहे. ही दोन्ही स्टेशन यापूर्वी सिलिगुडी आणि कोलकाता या जुन्या ब्रॉड गेज रेल्वेच्या मार्गावर होती. जो सध्याच्या बांगलादेशमधून जातो.