PM-WANI मुळं देशात येणार Wi Fi क्रांती, देशात प्रत्येक ठिकाणी फ्रि वाय-फाय

0
544

भारतात वाय-फाय क्रांती आणण्यासाठी केंद्र सरकारनं एक मोठा निर्णय घेतला आहे.पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत PM-WANI ही योजना देशभर लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेला ‘प्रधानमंत्री वाणी वाय-फाय अॅक्सेस इंटरफेस’ असं नाव देण्यात आलं आहे. या योजनेमुळे देशात प्रत्येक ठिकाणी फ्रि वाय-फाय मिळणार असून देशात वायफाय क्रांतीच होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कॅबिनेटच्या बैठकीला केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, रविशंकर प्रसाद आणि संतोष गंगवार आदी मंत्री उपस्थित होते. त्यांनीच नंतर ही माहिती दिली. देशात एक कोटी डेटा सेंटर उघडण्यात येणार आहेत. या योजनेला प्रधानमंत्री वाणी वाय-फाय अॅक्सेस इंटरफेस योजना असं नाव देण्यात आलं असून त्यामुळे देशात वाय-फाय क्रांतीच होणार असल्याचं केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितलं. या योजनेअंतर्गत देशात पब्लिक डेटा ऑफिस (PDO) उघडण्यात येणार आहेत. त्यासाठी लायसन्सची गरज पडणार नाही. कोणत्याही दुकानाचं डाटा ऑफिसमध्ये रुपांतर करता येऊ शकतं. सरकारकडून डाटा ऑफिस, डाटा अॅग्रिगेटर आणि अॅप सिस्टिम उघडण्यासाठी 7 दिवसात सेंटर उघडण्याची परवानगी दिली जाणार आहे.

कशी असेल योजना?
PM-WANI योजनेत तीन मुख्य मुद्दे असतील. पहिला मुद्दा म्हणजे पब्लिक डेटा ऑफिस म्हणजे पीडीओ. या अंतर्गत देशभर पब्लिक डेटा ऑफिस सुरु करण्यात येतील. यासाठी रजिस्ट्रेशन किंवा लायसन्स फी आवश्यक नसेल. दुसरा मुद्दा हा पब्लिक डेटा अॅग्रीगेटर हा असेल. याद्वारे पब्लिक डेटा ऑफिसचे अकाउंटिंग आणि कार्यप्रणाली वर देखरेख ठेवली जाणार आहे. तिसरा मुद्दा हा अॅप प्रोव्हायडर हा असेल. या योजनेसाठी एक खास अॅप तयार करण्यात येणार आहे आणि युजर्सना ते डाउनलोड करावं लागेल. त्याचे एक डिजिटल ऑथेंटिकेशन असेल. सरकार याला अॅप स्टोअर सोबत आपल्या वेबसाईटवरही दाखवणार आहे. याच्या जाहिराती आणि लिंक सार्वजनिक करण्यात येतील. त्यानंतर नागरिक देशातील कोणत्याही पब्लिक डेटा ऑफिसमधून वाय-फाय अॅक्सेस करु शकतील.

PM-WANI ही देशातील खूप मोठी क्रांती असेल. यामुळे देशातील प्रत्येक भागात इंटरनेटची उपलब्धता होण्यास मदत होणार आहे. यामुळे खेडेगावातील विद्यार्थी आपली पुस्तके डाउनलोड करु शकतात. या योजनेमुळे कौशल्य विकासाचं काम सुलभ होण्यास मदत होईल, व्यापार आणि उद्योगधंद्यांचे काम सुलभ होण्यास मदत होईल.

लक्षद्वीप बेटावरही फायबर कनेक्टिव्हिटी

लक्षद्वीप बेटांवरही फायबर कनेक्टिव्हिटी जोडण्यात येणार आहे. कोच्चिपासून लक्षद्वीपाच्या 11 बेटांवर 1000 दिवसांत कनेक्टिव्हिटी देण्यात येणार असल्याचं रविशंकर प्रसाद यांनी सांगितलं.