लग्न बजेटमध्ये झालेय; हनिमूनसाठी ठिकाणही बजेटमध्ये पाहताय तर नक्की वाचा

0
911

मार्चमध्ये आलेल्या कोरोना संकटामुळे अनेकांची लग्न पुढे गेली. काहींना तर मर्यादा ठेवून अनेकांच्या पत्रिका वाटून झाल्या होत्या, हॉल बुकींग झाली होती आणि अचानक आलेल्या कोरोना संकटामुळे सर्वकाही फिस्कटलं. लग्नाचा सोहळा अविस्मरणीय करण्यासाठी केलेला खर्च वाया गेला. त्यानंतर या कपल्सनी लॉकडाऊनच्या काळात कमी खर्चात लग्न केली. अगदी शंभर किंवा मोजक्या जणांमध्ये लग्न उरकून घेतली. ज्यांच्याकडे लग्नाचं मोठं बजेट नव्हतं त्यांनी देखील या काळात साध्या पद्धतीने लग्न केली. बजेट लग्न मनासारखं झाल्यानंतर आता बजेट हनिमूनसाठी आता नवनवीन कपल्स प्लॅन करायला लागले आहेत.

लोणावळा, खंडाळा,
कोल्हापूरचा पन्हाळा,
कुटं कुटं जायाचं हनिमूनला?..

ऐंशीच्या दशकात धम्माल लोकप्रिय झालेले हे गीत. हनिमूनची संकल्पना आपल्याकडे बऱ्यापैकी रुळू लागली तो काळ. त्या काळानुसार फेमस असणाऱ्या या पर्यटन स्थळांचा उल्लेख आणि तिकडे जाण्याची इच्छा. महाराष्ट्रातही हनिमूनला जाण्यासाठी अशी काही ठिकाणे आहेत त्याची आपण माहिती घेणार आहोत.

लोणावळा
कमी पैशांमध्ये जास्त आनंद मिळवण्यासाठी लोणावळा हिल स्टेशनची निवड अनेकजण करतात. पहाटे उठल्यावर धुक्याची चादर अंगावर घेऊन गरमागरम चहाचा घोट घेण्याची मज्जाचं वेगळी आहे. इथे येऊन अनेक लेण्या, किल्ले आणि धबधबे एकावेळी पाहता येतात. लोहगड किल्ला, कार्ला लेण्या, तिकोना किल्ला, विसापूर किल्ला, बेज्सा लेण्या, तुंगा किल्ला पाहण्यासारखा आहे. २००० रुपयांपासून इथे जाण्यासाठी पॅकेज मिळतं.

महाबळेश्वर
लग्न झाल्यानंतर पॉकेटला परवडेल असे पॉईंट शोधणाऱ्यांसाठी महाबळेश्वर हे उत्तम ठिकाण आहे. आता थंडीच्या दिवसात महाबळेश्वरला जाण्याइतकं सुख नाही. निसर्गाची देणं लाभलेलं महाबळेश्वर कपल्ससाठी बजेट ट्रीप आहे. मुंबई आणि पुण्यातील कपल्ससाठी पश्चिम घाटातील महाबळेश्वर उत्तम पर्याय आहे. इथे आल्यानंतर तुम्ही प्रतापगड किल्ला, वेण्णा तलाव, महाबळेश्वर मंदीर, कृष्णाबाई मंदिर, पंचगणी अशी ठिकाणं पाहू शकता. कमीत कमी ३००० रुपये इतक्या खर्चात तुम्ही हा प्लान करु शकता.

माथेरान
थंडीच्यावेळी सर्वाधिक पसंतीचं ठिकाणं म्हणून माथेरानची निवड हमखास केली जाते. मुंबईपासून ९४ किलोमीटर, लोणावळ्यापासून ५६ किलोमीटर तर पुण्यापासून १२२ किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. महाराष्ट्र पर्यावरण आणि वनविभागाने हे इको सेंसेटीव्ह झोन म्हणून निवडलंय. निसर्गाच्या साखळीत महत्वाचे असणारी अनेक झाडं, लहान-मोठे प्राणी तुम्हाला इथे पाहायला मिळतील. इथे एकाच ठिकाणी तुम्हाला ३८ व्ह्यू पॉईंट दिसतील. तुम्हाला इथे जाण्यासाठी ५,००० रुपयांपासून पुढे खर्च येऊ शकतो.

गणपतीपुळे
निसर्गरम्य वातावरणात उत्तम फिरण्याची सोय आणि देवदर्शन देखील करायचं असेलं तर गणपतीपुळे हा उत्तम पर्याय ठरु शकतो. रत्नागिरीपासून २४ किलोमीटर, पुण्यापासून ३०७ किलोमीटर तर मुंबईपासून ३४५ किलोमीटर अंतरावर हे ठिकाणं आहे. गणपतीपुळे मंदीराजवळ फिरायला समुद्र आणि राहण्याची सोय आहे. त्यामुळे तुमची सुट्टी इथे आनंदात जाऊ शकते. तुम्हाला इथे जाण्यासाठी ६,९०० रुपयांपासून पुढे पॅकेज दिले जातात.

पाचगणी
महाराष्ट्रातील लोकप्रिय टूरिस्ट पॉईंट म्हणून पाचगणीची ओळख आहे. मुंबईपासून २५४ किलोमीटर तर पुण्यापासून १०४ किलोमीटरवर हे ठिकाणं वसलंय. मुंबई-पुण्याजवळी उंच ठिकाणांमध्ये पाचगणी येतं. पांडवांनी इथे काही काळ वास्तव्य केल्याचं म्हटलं जातं. ब्रिटीशांसाठी तर हे रिटायर्टमेंटनंतर आरामाचं ठिकाणं होतं. या ठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला १६०० रुपयांपासून पॅकेज मिळतील.

खंडाळा
भारताच्या महाराष्ट्र राज्यातल्या सह्याद्री पर्वत रांगेतील पश्चिम घाटात खंडाळा हे हिल स्टेशन आहे. कोंकणाला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणाऱ्या सह्याद्री पर्वतराजीतील बोर घाट जेथे संपतो ते ठिकाण म्हणजे खंडाळा. उत्तर बाजूस खोल दरी आणि दक्षिण बाजूस सह्याद्री पर्वताचा उंच पहाड याच्या मध्यभागी खंडाळा गाव वसलेले आहे. गावाच्या उत्तर बाजूने मुंबई-पुणे हा राष्ट्रीय महामार्ग व भारतीय रेल्वे मार्ग जातो. खंडाळा स्टेशन हे कोंकण प्रांतातील कर्जत स्टेशननंतर थांबा असणारे स्थानक आहे. या ठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला २००० रुपयांपासून पॅकेज मिळतील.

केळशी
कोकण म्हटलं की रम्य समुद्रकिनारा, हिरवीगार शेते, मन शांत करणारी देवस्थाने अशी दृश्ये डोळ्यासमोर येतात. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात वसलेलं पाच ते सात हजार लोकवस्तीचं केळशी हे गाव अगदी असंच टुमदार आहे. कोकणातील इतर अनेक गावांसारखाच केळशीलाही रम्य, शांत, नयनमनोहर असा समुद्रकिनारा लाभला आहे, अगदी गोव्याच्या तोडीस तोड. आपली सुट्टी शांत वातावरणात घालवण्याची इच्छा असल्यास मुंबई व पुण्याहून सहज गाठता येणार्‍या या ठिकाणाला पर्याय नाही. या ठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला २५०० रुपयांपासून पॅकेज मिळतील.