जागतिक चहा दिन: चहा एक अमृततुल्य पेय

0
785

चहा… नुसता शब्द जरी उच्चारला तरी थकवा दूर होऊन तरतरी आल्यासारखं वाटतं. आपली सकाळ आणि सायंकाळ चहाविना अपूर्णच राहते. एखाद्या दिवशी सकाळी किंवा सायंकाळी चहा घेतला नाही तर आळस येतो. चहा म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. आहारातील इतर खाद्यपदार्थांप्रमाणेच चहा या पेयाचे स्थान देखील मोलाचे आहे. जवळपास 2000 वर्षांपूर्वी भारतातीलच एका बौद्ध भिक्षुंनी चहाचा शोध लावला होता. तेव्हा त्यांनी या वनस्पतीचा औषधी म्हणून वापर केला होता. आज जागतिक चहा दिवस आहे. या निमित्ताने आम्ही तुम्हाला चहाचा इतिहास सांगणार आहोत.

प्राचीन संदर्भ
चहा हे ब्रिटिशांचे पेय मानले जात असले तरी तसे नाही. त्याचे मूळ प्राचीन चीनशी जोडले जाते. ख्रिस्तपूर्व 30 वे शतक ते ख्रिस्तपूर्व 21 वे शतक या काळात कधीतरी चीनमध्ये चहाचा शोध लागल्याचे सांगितले जाते. ख्रिस्तपूर्व 2737 मध्ये शेन नुंग हा चीनचा तेव्हाचा सम्राट होता. सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर तो जंगलात राहत होता. दक्षिण चीनच्या दुर्गम भागात असताना एकदा तो एका औषधी वनस्पती असलेल्या झाडाखाली बसून गरम पाणी पीत असताना त्याच्या कपातील गरम पाण्यात त्या झाडाची काही पाने पडली. त्यामुळे पाण्याचा रंग आणि चवही बदलली. शेन नुंगला ते पाणी पिल्यामुळे एकदम तरतरी आली. त्याला ती चव खूप आवडली. पुढे त्याने गरम पाण्यात ती पाने घालून ते पाणी पिण्याची सवयच लावून घेतली. त्याने त्या परिसरात म्हणजे सिचुआन आणि युनानच्या डोंगररांगांच्या परिसरात त्या रोपांचा शोध घेतला. हीच रोपे चहाची रोपे म्हणून नावारूपास आली आणि आजच्या चहाचा जन्म झाला.

आपल्या भारत देशाचा विचार केला तर चहाला अंदाजे 200 ते 300 वर्षांचा इतिहास असल्याचे मानलं जातं. चहाचा मूळ उगम कोठे झाला? याबाबत मते-मतांतरे आहेत. परंतु, जगाचा विचार केला तर चीन आणि त्यानंतर भारत या देशांमध्ये चहाला प्राचीन इतिहास असल्याचा इतिहासकारांचा दावा आहे. आपल्या शेजारी असलेला चीन या देशात चहाचा शोध लागल्याचे मानले जाते. चीन आणि भारतात प्राचीन काळापासून चहाचा व्यापार होत आहे. असे असले तरी चीनच्या लोकांचे आवडते पेय असलेला चहा आपल्या भारत देशात पोहचण्यासाठी 17-18 वे शतक उजाडावे लागले. त्याला ब्रिटीश साम्राज्य कारणीभूत असल्याचे इतिहासकार सांगतात. ब्रिटिशांनी व्यापाराच्या उद्देशाने जगाचा प्रवास सुरू केला तेव्हा ते प्रत्येक देशातील संस्कृती, तेथील जीवनमानाचा जवळून अभ्यास करत असत. व्यापारासाठी भारतात आल्यावर त्यांनी शेजारील चीनची संस्कृती, तेथील लोकांची जीवनपद्धती देखील जाणून घेतली. तेव्हा ब्रिटिशांना चहाची माहिती झाली. त्यानंतर ब्रिटिशांनी बरचं राजकारण केल्यानंतर चहा भारतात आणला. त्यानंतर काही वर्षांचा कालावधी उलटला. ब्रिटीश भारत सोडून गेले. परंतु, त्यांनी भारतात आणलेला चहा मात्र येथेच राहिला. आज चहा भारतीयांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होऊन बसला आहे.

ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने उत्पादनाची सुरुवात केली
16 व्या दशकापर्यंत लोकांनी चहाच्या पानांचा वापर भाजीच्या रुपात केला. तसेच, याला वाटून ते काळं पेय बनवून त्याचं सेवन करायचे. पण, 19 व्या शतकात भारतात याचं उत्पादन ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने सुरु केलं. त्यासोबतच, ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने आसाममध्ये पहिली चहाची बागही सुरु करण्यात आली. त्यानंतर चहाचं चलन वाढलं. आज देशातील अनेक भागांमध्ये चहाची शेती केली जाते.

भारतातील चहाची लागवड
आज भारतात दार्जिलिंग, आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळमध्ये चहाच्या महत्त्वाच्या बागा आहेत. इथे सगळीकडेच उत्तम दर्जाचा चहा तयार होतो. टी बोर्ड ऑफ इंडियाच्या माहितीनुसार, सध्या संपूर्ण आसाममध्ये एकूण 43 हजार 292 चहाच्या बागा आहेत. 62 हजार 213 चहाच्या बागा निलगिरीमध्ये आहेत. तर दार्जिलिंगमध्ये 85 चहाच्या बागा आहेत.

भारतात चहा लोकप्रिय होण्यामागे ब्रिटिशांचे खूप प्रयत्न होते. भारतात रेल्वेचं आगमन झाल्यावर विविध रेल्वे स्टेशन्सवर चहाचे ठेले उभारले गेले. दुसर्‍या महायुद्धानंतर भारतात चहा लक्षणीयरीत्या लोकप्रिय झाला. 1900 शतकाच्या शेवटी भारतात उत्पादित होणार्‍या एकूण चहापैकी 71 टक्के चहा भारतातच विकला जात होता. आज भारतात दार्जिलिंग, आसाम, पश्चिम बंगाल, तामीळनाडू आणि केरळमध्ये चहाच्या महत्त्वाच्या बागा आहेत. इथे सगळीकडेच उत्तम दर्जाचा चहा तयार होतो आणि या चहा उत्पादकांनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. आज भारतात चहाच्या उद्योगातून लाखो लोकांना रोजगार मिळत आहे.

लहानथोर, गरीब श्रीमंत अशा सगळ्यांनी आपलंसं केलेला, माणसं जोडणारा, भूक भागवणारा, कधी भूक मारणाराही, नेहमीच्या टपरीवाल्याकडे कटिंग बनून येणारा आणि फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये नजाकतीने ’कस्टमर’समोर ‘प्रेझेंट’ होणारा… हे समस्त गुणविशेष मिरवणारा चहा हे जगात पाण्याच्या खालोखाल प्यालं जाणारं पेय आहे.