IndVsAus: पहिल्या टेस्ट सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा

0
241
  • ऑस्ट्रेलिया विरुद्ध 17 डिसेंबरपासून रंगणार पहिला कसोटी सामना

भारत-ऑस्ट्रेलिया याच्यातील कसोटी मालिकेला १७ डिसेंबरपासून प्रारंभ होणार असून अ‍ॅडलेड येथे गुलाबी चेंडूने प्रकाशझोतात ही लढत खेळली जाणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यासाठी विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय संघाची घोषणा बीसीसीआयनं केली आहे. बीसीसीआयनं आपल्या ट्विटरवर भारतीय संघ जाहीर केला आहे.

केएल-गिलला संधी नाही
पहिल्या या कसोटी सामन्यात केएल राहुलला आणि शुभमन गिलला संधी देण्यात आली नाही. या दोघांना संधी न दिल्याने या दोघांच्या चाहत्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजीची मदार उमेश यादव, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांच्यावर असणार आहे. तर फिरकी गोलंदाजीची जबाबदारी अनुभवी आर आश्विनकडे असणार आहे.

ऋद्धीमान साहाला विकेटकीपर म्हणून संधी
ऋद्धीमान साहा याला पहिल्या कसोटी सामन्यात विकेटकीपर म्हणून संधी देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलिया ए विरोधातील सराव सामन्यात या दोघांनी चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे या दोघांकडून विकेटकीपर म्हणून दावेदारी सिद्ध करण्यात आली होती. मात्र टीम मॅनेजमेंटने पंतऐवजी ऋद्धीमान साहावर विश्वास दाखवला आहे.

पहिल्या कसोटी सामन्यात मयंक अग्रवाल आणि पृथ्वी शॉ सलामीला येणार आहेत तर चेतेश्वर पुजारा तिसर्‍या क्रमांकावर येणार आहे.

कर्णधार विराट कोहली स्वत: चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येईल, तर पाचव्या क्रमांकावर अजिंक्य रहाणे येईल. जो संघाचा उपकर्णधारही आहे. हनुमा विहारी संघात फलंदाजीसाठी सहाव्या क्रमांकावर येईल तर सातव्या क्रमांकावर फिरकी गोलंदाज आर. अश्विन आहे. तो संघात प्रमुख फिरकीपटूचीही भूमिका साकारेल.

कसोटी क्रिकेट इतिहासात प्रथमच भारत आणि ऑस्ट्रेलिया डे-नाईट कसोटी सामने खेळणार आहेत. या सामन्यात विराट कोहली संघाचा कर्णधार असेल, परंतु त्यानंतर तो भारतात परत येईल आणि त्यानंतर पुढील तीन सामन्यांमध्ये संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी अजिंक्य रहाणेच्या खांद्यावर येणार आहे.

पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय टीम
मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), आर अश्विन, उमेश यादव, मो. शमी, जसप्रीत बुमराह.