International Sports University: देशातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ महाराष्ट्रात

0
535

महाराष्ट्रामध्ये विकासाच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे. २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात या विद्यापीठाच्या स्थापनेची घोषणा करण्यात आली. विधेयक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सादर करण्यात आले आणि त्यास दोन्ही सभागृहाने एकमताने मंजुरी दिली. येत्या शैक्षणिक वर्षापासून या विद्यापीठात प्रवेश प्रक्रियेसह अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार असल्याची माहिती क्रीडामंत्री सुनील केदार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अनेक देशात शालेय शिक्षणाबरोबरच खेळालाही महत्व देत आहेत. यामध्ये जपान, कोरिया, जर्मन, न्यूझीलंड आदी देश वेगाने प्रगतीकडे वाटचाल करीत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचाही विकास साधण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे क्रीडा मंत्र्यांनी स्पष्ट केले. विद्यापीठ स्थापनेनंतर प्रथम वर्षी स्पोर्टस सायन्स, स्पोर्टस टेक्नॉलॉजी, स्पोर्टस कोचिंग आणि ट्रेनिंग हे ३ अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार आहेत.

विद्यापीठ स्थापनेनंतर प्रथम वर्षी क्रीडा विज्ञान, क्रीडा तंत्रज्ञान व क्रीडा प्रशिक्षण हे तीन अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. प्रत्येक अभ्यासक्रमात ५० विद्यार्थी प्रवेशसंख्या निश्चित करण्यात आली आहे. त्यानंतर पुढील वर्षामध्ये मागणीनुसार आणि आवश्यकतेनुसार आणखी अभ्यासक्रम सुरू करता येतील.यामुळे शारीरिक शिक्षण, क्रीडा विज्ञान, क्रीडा वैद्यकशास्त्र, क्रीडा तंत्रज्ञान, क्रीडा प्रशासन, क्रीडा व्यवस्थापन, क्रीडा माध्यम आणि कम्युनिकेशन, क्रीडा प्रशिक्षण यामध्ये शिक्षणाच्या तसेच नोकरीच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास केदार यांनी व्यक्त केला. याशिवाय क्रीडा क्षेत्रातील तांत्रिक मनुष्यबळदेखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल. शारीरिक शिक्षण, क्रीडा शिक्षण यामध्ये संशोधन आणि विकास चांगल्याप्रकारे होईल असेही त्यांनी सांगितले.

सध्या क्रीडा विद्यापीठ सुरू होणार बालेवाडीतः राज्यात सध्या पुणे जिल्ह्यातील बालेवाडी येथे शिवछत्रपती क्रीडा संकुल सुरु आहे. या क्रीडा संकुलात विविध खेळांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. या सुविधांचे अद्ययावतीकरण तसेच नवीन सुविधा उपलब्ध करण्याची कार्यवाही सातत्याने होत असते. यामुळे हे विद्यापीठ सध्या शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथे कार्यान्वित करण्यात येणार आहे. नंतरच्या कालावधीत या विद्यापीठासाठी स्वतंत्र इमारत बांधकाम करण्यात येईल. इमारतीसाठी ४०० कोटीचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती क्रीडा मंत्र्यांनी दिली.

लक्ष ऑलिम्पिक सामन्यांचे
अनेक देश क्रीडा क्षेत्राकडे व्यापक दृष्टीकोन ठेवून शालेय शिक्षणाबरोबर खेळाला महत्व देत आहेत. यामध्ये जपान, कोरीया, जर्मन, न्युझीलंड आदी देश वेगाने प्रगतीकडे वाटचाल करीत आहेत. याचप्रमाणे महाराष्ट्राचाही विकास साधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्यामागे ऑलिम्पिक सामन्यांचे लक्ष ठेवण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकही या ठिकाणी आमंत्रित करण्यात येतील आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा निर्माण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले