WhatsApp हे जगभरात सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टंट मेसेजिंग अॅप आहे. संपूर्ण जगात हे अॅप सर्वाधिक लोकप्रिय होण्यामागे असलेलं प्रमुख कारण म्हणजे या अॅपचं युजर फ्रेंडली असणं. WhatsApp लाँचिंगपासून युजर्सच्या मागणीनुसार स्वतःला अधिक अद्ययावत करत आलेलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून तर WhatsApp ने नवनवीन फिचर्स आणि अपडेट्सचा सपाटा लावला आहे. आता कंपनीने अजून एक नवीन फिचर आणलं असून याद्वारे व्हॉट्सअॅप वेबवरुनही (डेस्कटॉप व्हर्जन) ऑडिओ किंवा व्हिडिओ कॉलिंगची सेवा मिळेल. व्हॉट्सअॅप वेबमध्ये व्हिडिओ/ऑडिओ कॉलिंगच्या फिचरवर अनेक दिवसांपासून चाचणी सुरू होती. रिपोर्टनुसार, कंपनीने बीटा युजर्ससाठी हे नवीन फिचर रोलआउट केलं आहे. टेस्टिंग पूर्ण झाल्यानंतर लवकरच कंपनीकडून हे फिचर सर्वांसाठी जारी केलं जाणार आहे.
या फिचरनुसार, कॉल आल्यानंतर WhatsApp Web मध्ये एक नवीन विंडो पॉप अप होईल, तिथून युजर्स कॉल स्वीकारू किंवा नाकारु शकतात. अशाचप्रकारे WhatsApp Web वरुन कॉलिंग करण्यासाठीही एक पॉप अप मिळेल, तिथे कॉलिंगसाठी पर्याय दिलेला असेल. अन्य व्हिडिओ कॉलिंग प्लॅटफॉर्मप्रमाणे यामध्येही युजर्सना व्हिडिओ ऑफ, व्हॉइस म्यूट आणि रिजेक्ट करण्याचा पर्याय मिळेल. मात्र, हे फिचर सामान्य युजर्ससाठी कधीपर्यंत रोलआउट केलं जाईल हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये.
टुगेदर अॅट होम’ स्टिकर
व्हॉट्सअॅपने युजर्ससाठी WHO चं टुगेदर अॅट होम स्टिकर्स अपडेट केले आहेत. कंपनीचं म्हणणं आहे की, हा स्टिकर पॅक सर्वाधिक लोकप्रिय आहे. तसेच नवीन अपडेटसह यामध्ये अनेक अॅनिमेटेड स्टिकर्स समविष्ट केले जाणार आहेत. यामुळे युजर्सचा चॅटिंग एक्सपिरियन्स अधिक चांगला होईल.
नऊ भाषांमध्ये वापर करता येईल
व्हॉट्सअॅपचं स्टिकर्स हे फिचर आता नऊ भाषांमध्ये वापरता येईल. यामध्ये अरबी, फ्रेंच, जर्मन, इंडोनेशियन, इटालियन, पोर्तुगीज, रशियन, स्पॅनिश आणि तुर्की भाषेचा समावेश करण्यात आला आहे.
सर्च ऑप्शनचा वापर कसा कराल
युजर्स ज्याप्रकारे इमोजी आणि GIF सर्च करतात, तीच प्रकिया स्टिकर शोधण्यासाठी वापता येईल. इमोजीस पर्यायावर क्लिक करावं लागेल. त्यानंतर खाली इमोजी, जीआयएफ आणि स्टिकर्सचा पर्याय आहे. जीआयएफ पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हवे असलेले स्टिकर्स मिळवता येतील.