IND vs AUS: दुसऱ्या डावात भारतीय संघ ३६ धावामंध्ये ऑलआऊट; भारतीय संघाची लाजिरवाणी कामगिरी

0
200

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात अ‌ॅडिलेड ओव्हल येथे पहिला कसोटी सामना खेळण्यात येत आहे. या सामन्याचा आजचा (19 डिसेंबर) तिसरा दिवस आहे. पहिल्या कसोटी सामन्यात ५३ धावांची आघाडी घेणाऱ्या भारतीय संघाची फलंदाजी दुसऱ्या डावात कोसळली आहे. हेजलवूड आणि कमिन्सच्या धारधार गोलंदाजीपुढे भारतीय संघातील दिग्गज एकापाठोपाठ माघारी परतले. दुसऱ्या दिवसाअखेरीस १ बाद ९ वर डाव संपवलेल्या भारताकडे ६२ धावांची आघाडी होती. मात्र तिसऱ्या दिवसाच्या खेळात कांगारुंच्या वेगवान माऱ्यासमोर भारतीय फलंदाजीचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. दुसऱ्या डावांत भारतीय संघाला ९ गड्यांच्या मोबदल्यात ३६ धावांपर्यंत मजल मारता आली.

भारताच्या या खराब फलंदाजीमुळे ४६ वर्षांपूर्वीचा लाजीरवाणा विक्रमही आज तुटला आहे. १९७४ मध्ये लॉर्ड्सवर इंग्लंडविरोधात झालेल्या कसोटी सामन्यात भारतीय संघानं ४२ धावांची निच्चांकी धावसंख्या उभारली होती. आता ४६ वर्षांनंतर भारतानं हा लाजीरवाणा विक्रम मोडला आहे. भारतीय संघाच्या कोणत्याही फलंदाजाला धावसंख्येचा दुहेरी आकडा गाठता आला नाही. मयांक अग्रवालने सर्वाधिक 9 धावा केल्या. तर हनुमा विहारीला 8 धावा करण्यात यश आलं. चेतेश्वर पुजारा, अजिंक रहाणे आणि आर अश्विनला भोपळाही फोडता आला नाही. ऑस्ट्रेलियाकडून जोस हेजलवूडने अवघ्या 8 धावा देऊन 5 विकेट्स घेतल्या तर पॅट कमिन्सला 21 धावा देऊन चार विकेट्स मिळवता आल्या.

भारतीय फलंदाजांनी फारच खराब कामगिरी केली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी भारतीय संघाकडे 62 धावांची आघाडी होती. परंतु भारताने स्वप्नातही विचार केला नसेल की, तिसऱ्या दिवशी संघाची अवस्था एवढी वाईट होईल. . दुसऱ्या डावात संघाने अत्यंत वाईट कामगिरी केली. यादरम्यान फलंदाज मोहम्मद शमी धाव करून दुखापतग्रस्त झाल्याने भारताने आपला डाव ३६ धावांवरच घोषित केला. त्यामुळे आता ऑस्ट्रेलिया संघाला विजयासाठी ९० धावा करायच्या आहेत.

भारताची कसोटीत खराब कामगिरी
3️6 धावा वि. ऑस्ट्रेलिया, अॅडलेड, 2020*
4️2️ धावा वि. इंग्लंड, लॉर्ड्स, 1974
5️8 धावा वि. ऑस्ट्रेलिया, ब्रिस्बेन, 1947
6️6 धावा वि. दक्षिण आफ्रिका, डर्बन, 1996
6️7 धावा वि. ऑस्ट्रेलिया, मेलबर्न, 1948

अशीच सुमार कामगिरी भारताची या सिरीजमध्ये राहिली तर ४-० च्या फरकाने ऑस्ट्रेलिया सहज मात करेल यात शंका नाही. दुसऱ्या कसोटीपासून विराट कोहलीही भारतीय संघात नसल्याने भारतीय संघ आता कशाप्रकारे कामगिरी करेल यावर सर्वांचेच लक्ष्य असणार आहे.