झी मराठी वाहिनीवर 31 डिसेंबर पासून ‘काय घडलं त्या रात्री?’ ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने जवळपास 13 वर्षानंतर प्रसिद्ध अभिनेत्री मानसी साळवी हिची मराठी टेलिव्हिजनवर पुन्हा एकदा दमदार एन्ट्री होतेय. मानसीने याआधी झी मराठीवरील ‘सौदामिनी’ आणि ‘नुपूर’ या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. झी मराठीवरील गाजलेल्या ‘असंभव’ या मालिकेत मानसीने साकारलेली शुभ्राची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडली होती.
काय घडलं त्या रात्री? या मालिकेमध्ये मानसी साळवी एका आयपीएस (IPS) अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. एका प्रतिष्ठित व्यक्तीच्या हत्येचा तपास करण्याची जबाबदारी तिच्यावर सोपवण्यात येते. हुशार आणि चलाख पोलीस ऑफिसर तिच्या पद्धतीने या हत्येचा तपास कसा करते हे या मालिकेमध्ये दाखवण्यात येणार आहे. राजकारण्यांच्या दबावासमोर न झुकता काम करणारी महिला अशी तिची ओळख असते.
एक कणखर, निडर पोलिस अधिकारी पण वैयक्तिक आयुष्यात तितकीच प्रेमळ आई असा दुहेरी पदर तिच्या मालिकेतील पात्राला आहे. त्यामुळे अनेक वर्षांनी मराठी रसिकांना भेटायला येणारी मानसी पुन्हा काय नवं घेऊन येणार याची तिच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. या मालिकेत सुशांत शेलार, स्मिता गोंदकर, जयवंत वाडकर हे कलाकार देखील दिसणार आहेत.
मानसी साळवी भूमिकेबद्दल काय म्हणाली?
तिच्या या नवीन व्यक्तिरेखेबद्दल बोलताना मानसी म्हणाली, “प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं की त्याला एक अशी दमदार भूमिका साकारायला मिळावी जी त्याला आपलीशी वाटेल. ‘काय घडलं त्या रात्री?’ या मालिकेत आय.पी.एस. ऑफिसर रेवती बोरकरची भूमिका साकारताना मला खूप आनंद आणि अभिमान वाटतोय. ती एक कणखर अधिकारी आणि एक प्रेमळ आई अशा दुहेरी भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. कायदा, आदेश आणि न्याय यांचं पालन आणि आदर करत पोलीस खातं, नागरिक, राज्य आणि आपला देश यांच्याप्रती आपल काम चोख बजावण्यासाठी ती प्रयत्नशील आहे. ती एक तत्व निष्ठ आयपीएस ऑफिसर जी बदलत्या परिस्थितीत देखील आपल्या तत्वांशी एकनिष्ठ असते. 13 वर्ष उलटली असली तरी देखील आजही प्रेक्षकांना माझी कारकीर्द लक्षात आहे आणि ते माझ्या आगामी भूमिकेला देखील तितकाच आपुलकीने प्रोत्साहन देत आहेत यासाठी मी प्रेक्षकांची ऋणी आहे.”
एक प्रामाणिक महिला आय.पी.एस. ऑफीसर या मृत्यु मागचे गूढ कसं उलगडणार हे ‘काय घडलं त्या रात्री?’ या मालिकेत प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. येत्या 31 डिसेंबर पासून गुरुवार ते शनिवार रात्री 9.30 ते 10. 30 ही मालिका भेटीला येत आहे.