राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चित्रपट, कला आणि सांस्कृतिक विभागाच्या अध्यक्षपदी अभिनेता गिरीश परदेशी यांची निवड

0
323

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चित्रपट, कला आणि सांस्कृतिक विभागाच्या पुणे शहराच्या अध्यक्षपदी गिरीश परदेशी यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा. सुप्रिया सुळे, अदिती तटकरे आणि कला व सांस्कृतिक सेलचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील उपस्थित होते.

गिरीश परदेशी यांनी गेल्या पंधरा वर्षांमध्ये हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आपला ठसा उमटवला आहे. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा दिल्ली येथून त्यांनी अभिनय व नाटकाचे प्रशिक्षण घेतले असून टिमवीतून त्यांनी प्राच्य विद्या पारंगत केली आहे. त्यांच्या कामाचा अनुभव नवोदित कलाकारांसाठी फायद्याचा ठरणार आहे. फॉरेनची पाटलीन या चित्रपटातून प्रेक्षकांशी नातं जोडणाऱ्या गिरीश परदेशी यांनी यापूर्वी अनेक चित्रपट केले आहे. मर्मबंध, गार्गी, मॅरेथोन जिंदगी, मी. एक्स, अण्णा हजारे यांसारख्या संवेदनशील चित्रपटांतून त्यांनी चित्रपटसृष्टीत आपल्या कामाची प्रतिष्ठा वाढवली आहे. गिरीश परदेशी यांनी या सुखांनो या, मृत्युंजय कर्ण, वहिनी साहेब, तुजविण सख्या रे, जयोस्तुते अशा लोकप्रिय मालिकांमधून वेगवेगळ्या भूमिका साकारत लोकांना आपल्या असामान्य अभिनयातून भुरळ घातली होती.

यावेळी बोलताना अभिनेते गिरीश परदेशी म्हणाले, आपल्या आवडीच्या क्षेत्रात महत्त्वाचे पद मिळणं हे कुठल्या पुरस्कारापेक्षा कमी नाही. या पदाअंतर्गत येणारी कार्य पार पाडण्याचा माझा प्रयत्न चालू असेलच पण याव्यतिरिक्त कलाकारांना उत्तेजन देणे, कलाकारांच्या समस्यांचे निवारण करण्याचा मी प्रयत्न करेल. पुणे हे सांस्कृतिक शहर असल्यामुळे इथे सांस्कृतिक विकासाची गरज नाही असे अनेकांना वाटते. पुण्यामध्ये प्रायोगिक नाटके, व्यावसायिक नाटके आणि चित्रपटांचे चित्रीकरण होते. परंतु मालिकांचे चित्रीकरण पुण्यात होत नाही, यासाठी काही पावले उचलणार आहे. या माध्यमातून पूर्वीप्रमाणे पुन्हा पुण्यात होणाऱ्या मालिकांचे चित्रीकरण स्थानिक कलाकारांना अनुभवता येईल. तसेच स्थायिक भागात कलेचा विस्तार होत असेल तर कलाकारांना ते परवडणारे असेल.

अभिनेते गिरीश परदेशी केवळ चित्रपटसृष्टी पुरते मर्यादित राहिले नाही. गेल्या पाच वर्षांपासून त्यांनी विविध शैक्षणिक संस्थांमध्ये आपले काम विस्तारित केले. अभिनयाचे इत्यंभूत प्रशिक्षण देण्यासाठी त्यांनी प्रियदर्शी अकादमीची स्थापना केली आहे. तसेच ते क्रिशिव क्रिएशनचे उपाध्यक्ष असून इंदिरा स्कूल ऑफ कम्युनिकेशन येथे ते निर्देशक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या आतापर्यंतच्या कामांचा सत्कार म्हणून त्यांना आजपर्यंत झी गौरव सर्वोत्कृष्ट अभिनेता, गोवा राज्य सर्वोत्कृष्ट अभिनेता, झी गौरव सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता, सर्वोत्कृष्ट स्टोरीटेलरसारख्या अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. याशिवाय त्यांची नाटके देश विदेशातील अनेक आंतरराष्ट्रीय महोत्सवात पोहोचली आहे.

नाटक, धारावाहिक आणि चित्रपटांचा अनुभव असल्यामुळे कलाकारांच्या समस्यांना त्यांनी जवळून पाहिले आहे. याविषयी बोलताना गिरीश परदेशी म्हणाले, माझ्या अनुभवाचा उपयोग करून कलाकारांसाठी कलेचा प्रवास सुकर करण्याचा माझा आग्रह करेल. तसेच स्थानिक कलाकारांना आणि स्थानिक कलेला प्राधान्य देणे, अभिनेत्यांव्यतिरिक्त पडद्या मागच्या कलाकारांना उत्तेजन देणे या दिशेने कार्य सुरू करणार आहे.

प्रायोगिक रंगभूमीच्या समस्या, तालमीच्या जागा मिळण्यासाठी निर्माण होणाऱ्या समस्या, प्रशिक्षणाची कमतरता या प्रमुख अडचणी दूर करून यातून प्रायोगिक रंगभूमी अधिक सशक्त करण्यासाठी मेहनत घेणार आहे. लॉकडाऊन काळात अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामध्ये लोककला सादरीकरण करणाऱ्या कलाकारांचे हातावर पोट असल्यामुळे कठीण परिस्थिती निर्माण झाली होती. त्यांच्याकरीता काम करणार असल्याची भावना गिरीश परदेशी यांनी व्यक्त केली.