आयपीएल २०२२ पासून रंगणार दहा संघामध्ये थरार; BCCI च्या बैठकीत निर्णय

0
303

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाची 89 वी वार्षिक सर्वसाधारण सभा (AGM) गुरुवारी अहमदाबादमध्ये (Ahmedabad) झाली. या बैठकीमध्ये आयपीएल मध्ये मध्ये खेळवल्या जाणााऱ्या टीमबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. IPL 2022 मध्ये दोन नव्या टीमच्या समावेशावर या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. याशिवाय प्रथम श्रेणीच्या सर्व खेळाडूंना (महिला आणि पुरुष ) करोना महामारीमुळे सामने न होऊ शकल्यामुळे योग्य तो मोबदला देण्यावरही एकमत झालं आहे. २०२८च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याबाबतही या सभेमध्ये निर्णय झाला.

२०२१मध्ये ‘आयपीएल’चे संघ वाढवणे अतिशय घाईचे ठरेल. निविदा प्रक्रिया, खेळाडूंचा लिलाव, आदी प्रक्रिया इतक्या कमी कालावधीत पूर्ण करणे कठीण जाईल. त्यामुळेच २०२२पासून १० संघांचे ‘आयपीएल’ असेल. त्यामुळे स्पर्धेमधील सामन्यांची संख्या वाढणार आहे. नवीन दोन संघ कोणते असणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. आयपीएल २०२१ नंतर नव्या दोन संघाबाबत लिलाव प्रक्रिया सुरु होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

आयपीएलच्या संपूर्ण कालावधीसाठी दिग्गज परदेशी खेळाडूंची उपलब्धता सुनिश्चित करणेही आवश्यक आहे. प्रसारणाची रक्कम दर वर्षी 60 सामन्यांसाठी असते. आता पुन्हा नव्याने याचं नियोजन करावे लागणार आहे. सध्या स्टार इंडियाने सन 2018-2022 दरम्यानच्या कालावधीसाठी 16,347.50 कोटी रुपये दिले आहेत. ही किंमत दरवर्षी होणाऱ्या 60 सामन्यांसाठी आहे.

आयपीएलमध्ये सध्या मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज, सनरायजर्स हैदराबाद, दिल्ली कॅपिटल्स, किंग्ज इलेव्हन पंजाब, राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू असे आठ संघ आहेत. हे आठ संघ २०२१च्या आयपीएलमध्ये कायम असतील. पण त्यानंतर म्हणजे २०२२च्या हंगामात आठ ऐवजी १० संघांमध्ये आयपीएलची चुरस पाहायला मिळणार आहे.