देशातील अनेक राज्यांमध्ये शाळा-कॉलेज सुरू झाले आहेत. तसेच काही राज्यांमध्ये शाळा-कॉलेजेस सुरू होण्याच्या मार्गावर आहेत. यातच नवी माहिती समोर आली आहे की पुण्यामध्ये शाळा तसेच कॉलेजेस नवीन वर्षात सुरू होत आहेत. पुण्यात नवीन वर्षांत शाळेची (Pune School) घंटा वाजणार आहे. ४ जानेवारीपासून नववी ते बारावीच्या शाळा सुरू होणार आहे. पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी शासन नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे, असे आदेश दिले आहेत.
शाळा सुरु करताना शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या मार्फत १० नोव्हेंबर २०२० रोजी निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना /अटींचे पालन करणे बंधनकारक आहे. शाळेत स्वच्छता व निर्जंतुकीकरण विषयक सुविधा सुनिश्चित करण्यासाठी थर्मल स्कॅनर किंवा थर्मल गन, पल्स ऑक्सिमीटर, जंतुनाशक, साबण, पाणी या आवश्यक वस्तू शाळा प्रशासनाने ठेवणं बंधनकारक आहे.
शाळा वाहतूक सुविधांचेही निर्जंतुकीकरण नियमित करण्यात यावं. याबाबत उपाययोजना करणं आवश्यक आहे. शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कोविड १९ साठीची RTPCR चाचणी बंधनकारक आहे. चाचणीचे प्रयोगशाळेने दिलेले प्रमाणपत्र शाळा व्यवस्थापनाने परिमंडळ वैद्यकीय अधिकारी व क्षेत्रीय वैद्यकीय अधिकाऱ्यांना सादर करणं आवश्यक आहे असंही आयुक्तांनी म्हटलं आहे.
विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी त्यांच्या पालकांची लेखी सहमती शाळा प्रशासनाला देणं आवश्यक आहे. शाळेत व शाळेच्या परिसरात स्वच्छता राखण्यासाठी शाळा आणि परिसर रोज स्वच्छ करणं आवश्यक आहे.