आपलं सुखाचं हक्काचं माहेर सोडून मुलगी एका वेगळ्याच कुटुंबात प्रवेश करते. असे घर जे इथून पुढे तिचं होणार असतं. या प्रवासात तिला पतीची साथ असली तरी एका जिवाभावाच्या मैत्रिणीची तिला कायमच उणीव भासत असते. अशावेळी सासूच जर तिची सखी झाली तर नात्यांचा गोडवा अधिकच वाढतो. आणि घराचं गोकुळ होतं. अशाच एका गोड नात्याची कथा सांगणारी मालिका झी मराठीवर प्रेक्षकांना लवकरच पहायला मिळणार आहे. सासू-सुनेमधील मैत्रीचं हे नातं फार कमी वेळा पाहायला मिळतं. परंतु, येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत असंच सासू-सुनेचं मैत्रीचं नातं पाहायला मिळणार आहे.
ही गोष्ट आहे शकु आणि स्वीटूची नात्यानं या दोघी सासू सून आहेत. पण मनानं मैत्रीच्या धाग्यानं घट्ट बांधल्या गेल्या आहेत.मिश्किल सासू आणि खट्याळ सून मिळून घरात वेगळीच गंमत करतात. आणि या गंमतीचच नाव आहे ‘येऊ कशी तशी मी नांदायला’
गेल्या काही दिवसांपासून येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेच्या प्रोमोमुळे अनेकांना या मालिकेविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे ही मालिका नेमकी कधी सुरु होणार हा एकच प्रश्न प्रेक्षकांना सतावत आहे. मात्र, या मालिकेसाठी प्रेक्षकांना आता फार काळ वाट पाहवी लागणार नाहीये.
या मालिकेची पटकथा सुखदा आयरे, कथा विस्तार समीर काळभोर आणि संवाद किरण कुलकर्णी, पल्लवी करकेरा यांचे आहेत. मालिकेचे दिगदर्शक अजय मयेकर करत आहेत. शुभांगी गोखले,अदिती सारंगधर,दीप्ती केतकर प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. शाल्व किंजवडेकर नायकाच्या भूमिकेत आणि अन्विता फलटणकर नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहेत.ही मालिका नव्या वर्षात म्हणजे ४ जानेवारी २०२१ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.