सुपरस्टार रजनीकांत यांचा मोठा निर्णय; राजकारणाला केले टाटा

0
234

सुपरस्टार रजनीकांत यांच्या राजकारणातील प्रवेशाकडे त्याचे देशभरातील कोट्यवधी चाहते आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. रजनीकांत लवकरच आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात करत नव्या पक्षाची घोषणा करतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं असतानाच हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. रजनीकांत यांनी प्रकृतीच्या कारणास्तव राजकीय पक्ष सुरु करण्याचा विचार मागे घेतला आहे. रजनीकांत यांनी तीन पानांचं पत्र ट्विट करत ही घोषणा केली आहे. पक्ष स्थापन करत नसल्याबद्दल त्यांनी माफीदेखील मागितली आहे.

रजनीकांत यांच्या नव्या राजकीय पक्षाच्या लॉचिंगची तयारी एकीकडे सुरु होती. त्याच दरम्यान 25 डिसेंबरला अचानक त्यांना रक्तदाबाचा त्रास होऊ लागल्यानं चेन्नईतल्या एका हॉस्पिटलमधे दाखल करण्यात आलं. दोन दिवसानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्याचवेळी एक आठवडा पूर्ण विश्रांती करण्याचा सल्लाही डॉक्टरांनी दिला. त्यामुळे नव्या पक्षाचं लॉचिंग पुढे ढकललं जाणार की याची चर्चा होती. मात्र आज अचानक आपण हा निर्णयच मागे घेतल्याची घोषणा रजनीकांत यांनी केली.

रजनीकांत यांनी आपण राजकीय पक्ष सुरु करणार नसून आपली बिघडलेली प्रकृती हा देवाने दिलेला इशारा होता असं म्हटलं आहे. रजनीकांत यांनी यावेळी आपल्यावर विश्वास ठेवलेल्यांना आपण बळीचा बकरा झालो असं वाटू नये असं सांगताना बिघडलेली प्रकृती हा एक इशारा असल्याचा उल्लेख केला आहे. रजनीकांत यांनी म्हटलं आहे की, “गेल्या काही दिवसांत माझ्या प्रकृतीसंबंधी ज्या काही घडोमाडी झाल्या त्या मी देवाचा इशारा समजतो आणि २०२१ तामिळनाडू विधानसभा निवडणूक लढण्याचा विचार रद्द करत आहे”.

राजकारणात प्रवेश नाही पण लोकांसाठी काम सुरुच’
सुपरस्टार रजनीकांत यांनी आपण राजकारणात प्रवेश करणार नसल्याचं सांगितलं आहे. त्यासाठी त्यांनी आपल्या प्रकृती अस्वास्थ्याचं कारण दिलं आहे. असं असलं तरी रजनीकांत यांनी अजून एक महत्वाची घोषणा केलीय. आपण राजकारणातप्रवेश करणार नसलो तरी लोकांसाठी काम करत राहणार असल्याचं ते म्हणाले.

31 डिसेंबरला करणार होते पक्षाची घोषणा
रजनीकांत यांनी यापूर्वी घोषणा केली होती की, 31 डिसेंबरला आपण नव्या पक्षाची घोषणा करु. त्यामुळे आगामी तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत रजनीकांत उतरणार हे नक्की मानलं जात होतं. तसंच रजनीकांत हे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवारही असतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, आज रजनीकांत यांनी आपण राजकारणात प्रवेश करणार नसल्याचं एका पत्राद्वारे स्पष्ट केलं आहे.