ग्रामपंचायत निवडणुक कशाप्रकारे होते आणि त्याचे महत्त्व काय आहे?

0
1113

महाराष्ट्रातल्या 14 हजार 234 इतक्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचं बिगूल वाजलंय. तुमच्याबी गावातलं वातावरण सध्या तापलं असेल. बैठका, चर्चा यांनी जोर धरला असेल.ग्रामपंचायत : एखाद्या गावातील रहिवाशांच्या शासकीय व्यवहारांचे नियमन करणारी, त्याकरिता संकेत ठरविणारी आणि नियमांच्या विरुद्ध होणाऱ्या वर्तनाची दखल घेऊन कायदेशीर इलाज करणारी संस्था.

छोट्या खेडेगावाचा कारभार ग्रामपंचायत नावाची स्थानिक स्वराज्य संस्था पाहते. सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने हा कारभार पाहिला जातो. पंचायतराजमधील सर्वात खालच्या पण महत्त्वाच्या टप्प्याला ग्रामपंचायत म्हणतात. हिला ग्रामसभेची कार्यकारी समिती असेही म्हणतात. ग्रामपंचायतीचा कारभार महाराष्ट्रात लागू असणारा मुम्बई ग्रामपंचायत कायदा १९५८ कलम ५ अन्वये चालतो. नवीन ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार विभागीय आयुक्तांना असतो.ग्रामपंचायत निर्मितीसाठी किमान ६०० लोकसंख्या असणे आवश्यक असून डोंगरी भागात हे प्रमाण ३०० आहे. ग्रामपंचायत सदस्यांची संख्या कमीत कमी ७ व जास्तीत जास्त १७ असून ते लोकसंख्येवर निश्चित होते.

ग्रामपंचायत निवडणूक पद्धती

गावातील मतदार गुप्त पद्धतीनं ग्रामपंचायतीच्या सदस्यांची निवड करतात आणि मग या सदस्यांतून सरपंचाची निवड केली जाते.

ग्रामपंचायतीमधील सदस्यांची संख्या ही गावच्या एकूण लोकसंख्येच्या आधारे ठरवण्यात येते. ग्रामपंचायतीत कमीत कमी 7 तर जास्तीत जास्त 17 सदस्य असतात.

गावातील लोकसंख्येनुसारच निवडणूक अधिकारी गावाचे वॉर्ड (प्रभाग) तयार करतात. त्यानुसार गावाची विभागणी वेगवेगळ्या वॉर्डात केली जाते. प्रत्येक वॉर्डात समान लोकसंख्या असेल, असं पाहिलं जातं.
सद्स्यांची पात्रता :-
१) तो गावातील ग्रामसभेचा सदस्य असावा.
२) त्याचे नाव मतदार यादीत असणे आवश्यक आहे.
३) त्याने वयाची २१ वर्षे पूर्ण केलेली असावीत.

सरपंच पदाची निवड कशी होते?
देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं थेट जनतेतून सरपंच निवडण्याचा निर्णय घेतला होता. महाविकास आघाडी सरकारनं हा निर्णय रद्द करत निवडून आलेल्या सदस्यांमधून सरपंचांची निवड करण्याचं जाहीर केलं आहे.

त्यामुळे आता नवनिर्वाचित सदस्य त्यांच्यापैकी एका उमेदवाराची सरपंच म्हणून निवड करतील. पण, ही प्रक्रिया कशी पार पडते ते एका उदाहरणातून समजून घेऊया.

समजा माझ्या गावातील ग्रामपंचायत अकरा सदस्यांची आहे.

ही निवडणूक शिवसेना, भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी अशा पक्षांच्या चिन्हांवर नाही लढवता येत. गावात पॅनल्स तयार केले जातात. सरपंच पद ज्यांना हवं असतं, ते सगळ्यात आधी आपल्या पॅनेलमध्ये कुणाला घ्यायचं म्हणजे कोणत्या वॉर्डात कुणाला उभं करायचं हे ठरवतात.

अशाप्रकारे एका बाजूला एक पॅनेल, तर दुसऱ्या बाजूला दुसऱ्या गटाचं पॅनेल ठरवलं जातं. त्याला ग्रामविकास पॅनेल, बळीराजा पॅनेल अशाप्रकारे आपापल्या पसंतीची नावं दिली जातात. एखाद्या गावात दोन किंवा तीनही पॅनेल असू शकतात. याशिवाय एक किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती अपक्ष म्हणूनही निवडणूक लढवू शकतो.

एकदा का या दोन्ही पॅनेलच्या 11 उमेदवारांची नावं फायनल झाली की ते आम्ही सगळे एकत्र लढणार आम्हाला एकच निवडणूक चिन्ह द्या, अशी मागणी करतील आणि मग निवडणूक अधिकारी त्यांना चिन्ह देतात.मग ही दोन्ही पॅनेल्स आपापला गावाच्या विकासाचा जाहीरनामा म्हणजे आम्ही गावात कोणकोणती कामं करणार हे मतदारांना सांगतात आणि निवडणुकीला सामोरं जातात. एकूण सदस्य संख्या 11 पैकी एखाद्या पॅनलचे 7 सदस्य निवडून आल्यास बहुमत मिळतं. तेव्हा यामधील सक्षम सदस्यास सरपंच पदासाठी उमेदवार म्हणून निवडण्यात येतं.

पण, समजा जर 11 सदस्यांपैकी एका पॅनेलचे 6 अन् दुसऱ्या पॅनेलचे 5 सदस्य विजयी झाले, तर सरपंच पदासाठी घोडेबाजारीचे प्रकार घडू शकतात.म्हणजे काय तर दोन्ही पॅनेलमध्ये आपला सरपंच करण्याची स्पर्धा सुरू होते आणि मग एकमेकांच्या पॅनेलमधील सदस्य फोडण्याचे प्रयत्न केले जातात.

सरपंचाचे कार्य:-

  • मासिक सभा बोलावणे व त्यांचे अध्यक्षस्थान भूषविणे.
  • गावातील विकास योजनांची अंमलबजावणी करणे
  • ग्रामपंचायतीच्या कर्मचार्यांवर देखरेख व नियंत्रण ठेवणे.
  • योजनांना पंचायत समितीची मंजुरी घेणे.
  • ग्रामपंचायतीचा दस्तऐवज सुस्थितीत ठेवणे.

ग्रामपंचायतीचे मुख्य कामे:

गावात रस्ते बांधणे.
गावातील रस्त्यांची दुरुस्ती करणे.
दिवाबत्तीची सोय करणे.
जन्म, मृत्यू व विवाह यांची नोंद ठेवणे.
सार्वजनिक स्वच्छता ठेवणे.
सांडपाण्याची व्यवस्था करणे.
पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे.
शिक्षण तसेच आरोग्य विषयक सोयी पुरवणे.
शेती विकासाच्या व पशुधन सुधारणेच्या योजना अंमलात आणणे.
गावाचा बाजार, जत्रा, उत्सव, उरुस यांची व्यवस्था ठेवणे.