महाराष्ट्रात ६ जानेवारी हा दिवशी मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. मात्र, ६ जानेवारी हाच दिवस मराठी पत्रकार दिन म्हणून का साजरा केला जातो, असा आपल्या सर्वांना पडणे सहाजिक आहे सर्वांच पडतो. या दिनाचे तुम्हाला काय महत्व आहे हे आपण थोडक्या जाणून घ्या..६ जानेवारी १८१२ बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर यांचा जन्म दिवस आहे. जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’ हे मराठीतले पहिले वृत्तपत्र त्यांनी सुरू केले. या काळामध्ये बाळशास्त्रींनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले शिक्षणाच्या संदर्भामध्ये मोलाची भूमिका बजावली बाळशास्त्री जांभेकरांचा जन्मदिवस हा महाराष्ट्र सरकारतर्फे ‘दर्पण दिन’ अथवा ‘वृत्तपत्र दिन’ म्हणून साजरा होतो.
स्वातंत्र्य चळवळीत राजकीय भान निर्माण करणारी, अनेक सामाजिक बदलांसाठी आग्रही राहणारी ते आताची 24 बाय 7 पत्रकारिता…पेन ते काँप्युटर, खिळे जुळवण्यापासून ते डिजिटल प्रिंटिंग, मुद्रित माध्यमं, टीव्ही चॅनेल्स ते हातातल्या मोबाईलवर वेळोवेळी येणारे अपडेट्स… पत्रकारिता बदलत राहिली आहे. पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळख आहे.
पण, आज २१व्या शतकात या चौथ्या स्तंभाचा विचार केला असता, ‘माध्यमे खरंच आपली जबाबदारी पार पाडत आहेत का?’ हा मोठा प्रश्न आपल्यासमोर ‘आ’ वासून उभा ठाकला आहे. त्यासाठी सर्वप्रथम माध्यमांनी अधिकारांच्या किंवा सत्तेच्या दुरूपयोगाला थांबवण्याची गरज आहे. मात्र, सध्या माध्यमांचाच वापर एक सत्ताकेंद्र किंवा अधिकार केंद्र म्हणून सर्रास केला जातो. कोणत्याही देशांत लोकशाही तेव्हाच बळकट होते, जेव्हा तिथली माध्यमे स्वतंत्र आणि निष्पक्ष असतात. काही निष्पक्ष माध्यमे प्रथेप्रमाणे आपल्या देशातही आहेत. परंतु, पूर्वग्रहदूषितता आणि पक्षपातीपणानेही त्यांना ग्रासले आहेच. लोकशाहीमध्ये सर्वात जबाबदार असा हा माध्यमांचा चौथा स्तंभ. त्याचे कारण म्हणजे माध्यमांचा जनतेशी येणारा दैनंदिन संबंध. पण, एवढा सशक्त असलेला हा चौथा स्तंभ सध्या कमकुवत झालेला दिसतो. म्हणूनच आजच्या माध्यमांनी आरशात पाहण्याची, आत्मपरीक्षण करण्याची नितांत गरज आहे.
काही मीडिया हाऊस ब्रेकिंग न्यूजच्या नावाखाली मोठमोठ्याने ओरडणे तर काही मीडिया नकारात्मक गोष्टींवर जास्त भर देताना दिसत आहे. माझे असे म्हणणे नाही की सर्वच मिडिया हाऊस किंवा पत्रकारिता चुकीची आहे. त्यातल्या त्यात काही मीडिया हाऊस आणि पत्रकार आपले काम खूप चांगल्या प्रकारे काम करत आहे. पण सर्वांनी मिळून चांगली पत्रकरिता केली तर लोकशाहीच्या चौथा स्तंभाला खरी आणि योग्य ओळख प्राप्त होईल.
प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया सोबतच सध्या सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. जगभर आयटी क्षेत्रातील साक्षरतेचे प्रमाण वाढत चालल्याने ऑनलाईन पत्रकारितेचे क्षेत्र अधिकाधिक व्यापक होणार आहे. भारतीय पत्रकारितेला पत्रकारांच्या अनेक पिढ्यांनी समृध्द वारसा दिला आहे. त्यांच्या संस्कारांचे हे बाळकडू नव्याने उदयास येणा-या वेब पत्रकारितेसाठीही महत्वाचे ठरत आहे. सुरूवातीला केवळ इंग्रजीमध्ये असलेली महाजालाची दुनिया आता तंत्रज्ञानाच्या विकासासोबत प्रादेशिक भाषांमध्येही उपलब्ध झाल्याने प्रादेशिक भाषांमधील ऑनलाईन वृत्तपत्रे वाचकांना अधिक जवळची वाटू लागली आहेत. पुढील काही वर्षांनी प्रिंट मीडिया पेक्षा ऑनलाईन वेब पोर्टल म्हणजेच ऑनलाईन पत्रकारितेला विशेष महत्त्व प्राप्त होणार हे मात्र नक्कीच.