वेगवान गोलंदाज नवदीप सैनीचं कसोटी पदार्पण; कधी काळी २०० रुपयांसाठी क्रिकेट खेळायचा हा खेळाडू

0
288

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात वेगवान गोलंदाज नवदीप सैनीनं भारतीय संघाकडून कसोटी पदार्पण केलं आहे. कसोटी पदार्पण करणारा सैनी २९९ वा भारतीय खेळाडू ठरला आहे. उमेश यादवला दुसऱ्या सामन्यात दुखपत झाल्यानंतर नवदीप सैनीला तिसऱ्या सामन्यात संधी देण्यात आली आहे.

28 वर्षांचा नवदीप सैनी 140 किमी प्रती तासाच्या वेगाने सलग बॉलिंग करू शकतो. त्याने भारतासाठी वनडे आणि टी-20 क्रिकेटमध्ये आधीच पदार्पण केलं आहे. सैनीने भारताकडून 9 टी-20 मॅचमध्ये 13 विकेट तर 7 वनडेमध्ये 6 विकेट घेतल्या आहेत.

रणजी ट्रॉफीमध्ये नवदीप सैनी दिल्लीकडून खेळतो, पण तो हरियाणाच्या करनालचा आहे. कधीकाळी नवदीप सैनी 200 रुपये मिळवण्यासाठी स्थानिक क्रिकेट खेळायचा. 2013 पर्यंत त्याने फक्त टेनिस बॉलने क्रिकेट खेळलं होतं.

करनाल प्रीमियर लीगमध्ये दिल्लीचे माजी फास्ट बॉलर सुमित नरवाल सैनीची बॉलिंग बघून प्रभावित झाले. यानंतर त्यांनी सैनीला दिल्लीला बोलावलं. दिल्लीमध्ये सैनीने गौतम गंभीरला नेटमध्ये बॉलिंग केली. गौतम गंभीरलाही सैनीमध्ये भविष्य दिसलं, त्यामुळे त्याने सैनीला रोज सरावासाठी यायला सांगितलं. गौतम गंभीरच्या पाठिंब्यामुळे नवदीप सैनीची दिल्लीच्या टेस्ट टीममध्ये निवड झाली. 2013-14 सालानंतर सैनीने मागे वळून पाहिलं नाही.

क्रिकेट खेळायला सुरुवात केल्यानंतर टेनिस चेंडूवर खेळत असताना नवदीपला एका सामन्यासाठी २०० रुपये मिळायचे. टेनिस ते सीजन असा नवदीपचा खडतर प्रवास आजच्या युवा खेळाडूंसाठी प्रेणादायी आहे.

सैनीची प्रथम श्रेणी कारकिर्द
सैनीने 46 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 128 विकेट्स घेतल्या आहेत. 32 धावा देऊन 6 विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे. सैनीने एकूण 4 वेळा एका डावात 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. दरम्यान सैनीआधी ऑस्ट्रेलियाविरोधातील दुसऱ्या कसोटी सामन्यात शुभमन गिल आणि मोहम्मद सिराज या खेळाडूंनीही कसोटी पदार्पण केलं होतं.